Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सागवान तस्करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

सिरोंचा वनविभागाच्या दोन कारवाईने तस्कर धास्तावले...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

सिरोंचा (जि. गडचिरोली) : जंगलसंपत्तीचा अमूल्य ठेवा असलेला सागवान वृक्ष अवैधरित्या तोडून त्याची तस्करी थांबवण्यासाठी वन विभागाने सिरोंचा तालुक्यात निर्णायक कारवाई केली. अवघ्या एका दिवसात दोन ठिकाणी केलेल्या छाप्यांमधून एकूण २.२७ लाख रुपयांचे साग लाकूड आणि सुमारे चार लाखांची बोलेरो जप्त करण्यात आली असून, तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणांना मोठा आळा बसण्याची चिन्हे आहेत.

गुप्त माहितीवरून आसरअल्ली परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास पातागुडम रोडवर सापळा रचला. या वेळी तेलंगणा राज्याकडे जाणारी बोलेरो (क्रमांक AP-24/AB-9556) आढळून आली. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ८ साग लठ्ठ सापडले. वाहनचालक राजकुमार अर्जन्ना सुदुला (रा. सोमनपल्ली) याला अटक करण्यात आली. बोलेरोसह साग लाकूड असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याच दिवशी दुसऱ्या घटनेत, अंकिसा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक २७४ मध्ये सागवान वृक्षांची कत्तल करून लठ्ठ तयार करून साठवण्यात आल्याची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. घटनास्थळी ८ लठ्ठ साग लाकूड सापडले. दोन संशयित आरोपी प्रसाद रामचंद्र तोरेम व राममुर्ती शंकर मोर्ला (दोघे रा. गोल्लागुडम) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी तस्करीचे कृत्य कबूल केले आहे. या घटनेत १.२४ लाख रुपयांचे लाकूड आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.

सदर दोन्ही घटनांमध्ये भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत कलम २६ (१)(ई), ४१, ४२ आणि ५२ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणांतील न्यायालयीन कार्यवाही सुरू असून, वन विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ही कारवाई उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी (IFS) व उपविभागीय वन अधिकारी अक्षय मिना (IFS) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. तोकला यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत व्ही. आर. गोल्लेवार (क्षेत्र सहाय्यक), बी. के. पाडदे, ए. जी. दोनाडकर, आर. व्ही. साळवे, डी. पी. गोटा (वनरक्षक) आदी कर्मचाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

सिरोंचा परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवान वृक्षतोड व तस्करीच्या वाढत्या घटनांवर ही कारवाई कठोर इशारा ठरत असून, वन विभागाच्या तत्परतेमुळे नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण अधिक प्रभावीपणे साध्य होणार असल्याची नागरिकांमध्ये भावना व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.