नागपूर विभागातील 1,582 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सात महिन्यांत 13.81 कोटींची मदत..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. 12 :
राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा अक्षरशः ‘आयुष्याचा आधार’ ठरत आहे. नागपूर विभागात यंदाच्या जानेवारी ते जुलै या अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1,582 रुग्णांना 13 कोटी 81 लाख 20 हजार रुपयांची वैद्यकीय मदत मिळाली आहे. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पेपरलेस व डिजिटल प्रक्रियेच्या माध्यमातून थेट जिल्हास्तरावरून उपलब्ध झाली असून, रुग्णांना मंत्रालयाची पायरी चढण्याची आवश्यकता भासली नाही.
पेपरलेस प्रणाली – थेट जिल्ह्यातून मदत…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यभर जिल्हा कक्षांची स्थापना व कामकाज डिजिटल स्वरूपात आणण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी वेळेत आर्थिक सहाय्य मिळत असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. लाभार्थ्यांनी सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजना वापराव्यात. जर उपचार या योजनांतून शक्य नसतील, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून संलग्न रुग्णालयांच्या माध्यमातून मदत अर्ज करता येतो.
या प्रक्रियेमुळे शासकीय संसाधनांचा जास्तीतजास्त वापर होतो आणि निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतो. “यापुढेही अधिकाधिक रुग्णांना मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
नागपूर विभागातील मदतीचा जिल्हानिहाय आढावा….
(1 जानेवारी ते 31 जुलै 2025)
जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम (₹)
नागपूर 1,396 12,16,82,000
वर्धा 41 39,55,000
भंडारा 31 29,35,000
गोंदिया 50 39,00,000
चंद्रपूर 54 47,48,000
गडचिरोली 9 9,00,000
कोणत्या आजारांसाठी मदत मिळते?…
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून 20 गंभीर आजारांसाठी मदत केली जाते. त्यात
कॉक्लियर इम्प्लांट (वय 2 ते 6 वर्षे)
हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण
कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)
रस्ते अपघातातील उपचार
बालकांच्या शस्त्रक्रिया
हिप व गुडघा रिप्लेसमेंट
मेंदूचे आजार, डायालिसिस, अस्थिबंधन
बर्न / विद्युत अपघातग्रस्त उपचार
नवजात शिशुंचे गंभीर आजार इ.
मदतीसाठी आवश्यक कागदपत्रे……
रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड
रुग्ण दाखल असल्यास जिओ-टॅग फोटो (अनिवार्य)
तहसील उत्पन्नाचा दाखला (₹1.60 लाखांपेक्षा कमी)
वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र
अपघातग्रस्तांसाठी एफआयआर
अवयव प्रत्यारोपणासाठी ZTCC पावती
सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात
📧 [email protected] येथे पाठवावीत.
📞 टोल फ्री क्रमांक: 9321 103 103
Comments are closed.