उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल केले सन्मानित..
पुनः अहेरी उपविभागाला राज्यस्तरीय गौरवमुद्रा..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाच्या मंगलप्रभातीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल व जिल्हाधिकारी अविष्यात पंडा यांच्या करकमलातून अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय व्ही. कोकाटे यांना महाराष्ट्र शासनाचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. हा सन्मान ‘शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम’ अंतर्गत उपविभाग स्तरावरील उल्लेखनीय कार्याबद्दल बहाल करण्यात आला असून, नागपूर विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी गटातून अहेरी उपविभागाने द्वितीय क्रमांकाचे मानकरी स्थान संपादन केले आहे.
राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरील तब्बल १२,५०० शासकीय कार्यालयांमध्ये राबविल्या गेलेल्या या मोहिमेत अहेरी उपविभागाने जनसेवेची गती, कार्यक्षमता आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीचा उत्तम संगम साधला. पासपोर्ट पडताळणी व नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान केली. कोनसरी येथील पोलीस बीट इमारत साकारून कार्यान्वित केली. नागरिक कृती शाखेतून समाजहितार्थ उपक्रम राबवले. जप्त केलेला अमूल्य मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द केला. अवैध मद्यसाठ्याचा नाश करून कायदा-सुव्यवस्थेला बळ दिले. तसेच डायल ११२ वर आलेल्या आपत्कालीन तक्रारींना क्षणात प्रतिसाद देऊन जनविश्वास अधिक दृढ केला.
या प्रशस्तीपत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्वाक्षऱ्या असून, अहेरी उपविभागासाठी ही एक ऐतिहासिक गौरवमुद्रा ठरली आहे.
ही उल्लेखनीय यशकथा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक व अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली. “हा सन्मान हा केवळ माझ्या वैयक्तिक कार्याचा नाही, तर अहेरी उपविभागातील संपूर्ण पोलीस दलाच्या निष्ठा, परिश्रम व जनसेवेच्या व्रताचा विजय आहे,” असे कृतज्ञतेच्या स्वरात अजय कोकाटे यांनी नमूद केले.
Comments are closed.