Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कढोली नाल्याचा थरार : क्षणात वाहून गेलेला जीव, झाडाचा आधार, गावकऱ्यांची शर्थ आणि अखेर मृत्यूवर मात

ग्रामीण समाजजीवनातील एकतेचे आणि प्रसंगावधानाचे प्रतीक ठरली आहे. “वेळ आली होती, पण नशिब बलवत्तर होते,” या म्हणीची प्रचिती देत हरिदास बावनथडे यांचा जीव गावकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला हे निश्चित....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात घडलेली घटना ही पावसाळ्यातील पुराच्या भीषणतेचे आणि ग्रामीण भागातील संकटाच्या छायेत जगण्याचे जिवंत उदाहरण ठरली. नाल्याच्या उफाणलेल्या पाण्यात अडकलेला एक ६० वर्षीय इसम, मृत्यूच्या दारात पोहोचलेला आणि गावकऱ्यांच्या एकजुटीने त्याला वाचवण्यासाठी उभारलेली जीवाची शर्थ – या संपूर्ण घटनेने जिल्हाभरात खळबळ उडवली आहे.

सोनेरांगी गावातील हरिदास बावनथडे हे इसम आपल्या गावी येण्यासाठी निघाले होते. पण पावसामुळे कढोली नाल्यावरचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. तरीही हळूहळू सरकत ते पूल पार करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पाण्याचा वेग आणि पुलावर साचलेल्या चिखलामुळे त्यांचा तोल गेला आणि क्षणात ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले. पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की त्यांना सावरणेही अशक्य झाले आणि काही अंतरापर्यंत ते वेगवान प्रवाहाबरोबर ओढले गेले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अचानक त्यांच्या हाताला नदीपात्रातील झाडाची फांदी लागली. त्या क्षणी आलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांनी ती घट्ट पकडून धरली. एकीकडे पाण्याचा जोर, दुसरीकडे घसरत्या चिखलामुळे हात सुटण्याची भीती – या दोन तासांच्या संघर्षाने गावकऱ्यांचा हृदयाचा ठोका चुकवला होता. दुसऱ्या तीरावरून हे दृश्य पाहणाऱ्या काही लोकांनी तत्काळ सोनेरांगी गावात धाव घेऊन सरपंच बाबुराव कोहळे, पोलीस पाटील रुपेश नारनवरे, मोहन मडावी, अक्षय रणदिवे यांना कळवले.

गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून बचावमोहीम सुरू केली. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की सरळ उतरून मदत करणे शक्य नव्हते. त्यामुळे दोरखंडाचा आधार घेत नियोजन करून ग्रामस्थांनी हरिदासला हळूहळू बाहेर खेचण्याचे धाडसी काम केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर गावकऱ्यांना यश मिळाले आणि हरिदास बावनथडे यांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेदरम्यान नाल्यावरील थरारक दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून लोकांच्या अंगावर शहारे आणत आहे. गावकऱ्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे पावसाळ्यात अशा धोका पत्करून पूल पार करणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

 

Comments are closed.