जनतेच्या संघर्षाला यशाची चाहूल; मुख्यमंत्री १२ सप्टेंबरला सुरजागड–गट्टा रस्ता बाबत देणार अंतिम निर्णय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुरजागड–गट्टा या जनतेच्या जीवनवाहिनीसमान असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर प्रशासनाच्या दरवाजात प्रवेश मिळाला आहे. ८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निजी सचिव सुनील मित्रा यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून या रस्त्याच्या अत्यंत दयनीय स्थितीची मुख्यमंत्री पूर्ण दखल घेत आहेत. येत्या १२ सप्टेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री स्वतः याबाबत ठोस निर्णय घेणार आहेत, असे स्पष्ट आश्वासन दिले.
या बैठकीत आंदोलकांनी रस्त्याच्या बिकट अवस्थेचे भयावह चित्र समोर मांडले. दररोजचे अपघात, रुग्णवाहिकांना होणारा अडथळा, शाळा–कॉलेज गाठण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, तसेच स्थानिक ग्रामस्थांची हालअपेष्टा याची ठळक नोंद घेण्यात आली. खास करून लोखंडखनिज वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण केवळ विकासासाठीच नव्हे तर जनजीवनाच्या सुरक्षेसाठी अपरिहार्य असल्याचे आंदोलकांनी अधोरेखित केले.
गडचिरोली जिल्हा कोन्सिलतर्फे १५ सप्टेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धडक आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या खात्रीशीर आश्वासनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष १२ सप्टेंबरच्या निर्णयावर केंद्रीत झाले आहे.
या शिष्टमंडळात कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकपा), कॉ. डॉ. युगल रायलू (जिल्हा सचिव, नागपूर), कॉ. अमोल मारकवार (जिल्हा सचिव, माकपा), कॉ. सुरज जककुलवार (AISF) आणि कॉ. रवींद्र पराते (शहर सहसचिव, नागपूर) आदींचा समावेश होता.