लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वसई, मनोज सातवी
विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ३ (क्राईम ब्रँचच्या युनिट ३)ने धडाकेबाज कारवाई करून वसई येथून आठ कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुंदरसिंग देवडा (४९), युवराजसिंग राठोड (२८), तकतसिंग राजपूत (३८) अशी आरोपींची नावे असून हे तिघेही राजस्थान मधील जोधपूर आणि सिरोही येथील रहिवासी आहेत. आरोपीना वसई कोर्टात हजर केलं असता, न्यायालयाने सर्व आरोपीना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ३ ला वसई पूर्वेच्या फादरवाडी परिसरात काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने फादरवाडी – रेंजनाका रस्त्यावरील श्रीपाल टॉवर येथे सापळा रचून कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
यावेळी आरोपींकडून ८ कोटी ४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा २ किलो ११ ग्रॅम वजनाचा हेरॉईन नावाचा अमली पदार्थ आणि ५ लाख ६५ हजार किमतीची एक चारचाकी गाडी असा एकूण ८ कोटी १० लाख ५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई विरारच्या गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, आदींच्या पथकाने केली.