Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील अनेक पदे रिक्त

अस्थिरोग तज्ज्ञ व दंत शल्य चिकित्सकांच्या अभावाने रुग्णांचे हाल — सामाजिक कार्यकर्ते दीपक सुनतकर यांची आमदारांकडे धडक...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे पाच तालुक्यांसाठी (मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा) आरोग्यसेवेचे मुख्य केंद्र मानले जाते. मात्र, याच महत्त्वाच्या रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून अस्थिरोग तज्ज्ञ व दंत शल्य चिकित्सकाची पदे रिक्त असल्याने रुग्णांना गंभीर मानसिक, शारीरिक व आर्थिक हालांना सामोरे जावे लागत आहे.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या शेकडो रुग्णांना तज्ज्ञ उपचार न मिळाल्याने नागपूर, चंद्रपूर किंवा गडचिरोलीकडे महागड्या उपचारासाठी धाव घ्यावी लागते. स्थानिक पातळीवर मोफत किंवा परवडणाऱ्या उपचाराऐवजी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. हाड मोडल्यास प्लास्टर सारखा प्राथमिक उपचार किंवा दातांसाठी रूट कॅनल सारखी नियमित शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयातच होऊ शकली असती. परंतु तज्ज्ञ नसल्याने गरीब, निराधार रुग्णांना खिशाला परवडणार नाही अशा खर्चाला तोंड द्यावे लागते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या अन्यायकारक परिस्थितीविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते दीपक सुनतकर यांनी अहेरीचे आमदार यांना भेटून निवेदन सादर केले आहे. या पदांची तत्काळ भरती व्हावी, हीच मागणी त्यांनी जोरकसपणे मांडली.

“अहेरी हे संपूर्ण दक्षिण गडचिरोलीचे आरोग्य केंद्र आहे. येथेच जर मूलभूत उपचारांची सोय नसेल, तर आदिवासी, शेतकरी, मजूर वर्ग कुठे जाईल? हाड मोडल्यावर किंवा दातांच्या वेदनांनी हैराण झाल्यावर लोकांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. ही केवळ आरोग्याची समस्या नाही, तर जनतेच्या जगण्यावर घाला आहे. सरकारने ही पोकळी त्वरित भरून काढली पाहिजे, अन्यथा अहेरीतील जनतेचा रोष ओसंडून वाहील.”

दीपक सुनतकर 

सामाजिक कार्यकर्ते 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात ही केवळ दोन पदे नाहीत; तर हा जीव वाचवणारा आधार आहे. ग्रामीण व आदिवासी रुग्णांना शहरात धाडणे ही शासनाची उदासीनता ठरते. गरीबांच्या जिवाची किंमत इतकी स्वस्त कशी ठरू शकते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

आरोग्य विभागाने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ व दंत शल्य चिकित्सकांची पदे तातडीने भरण्याची गरज आहे. कारण हा प्रश्न फक्त रिक्त जागांचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यसुरक्षेचा आहे.

Comments are closed.