Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटीला दिवाळी हंगामात तब्बल ३०१ कोटींचं उत्पन्न — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कर्मचाऱ्यांना गौरवोद्गार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) यंदाच्या दिवाळी हंगामात तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळवून नवा आर्थिक विक्रम प्रस्थापित केला आहे. दिवाळी सुटीनंतरच्या परतीच्या प्रवासाच्या दिवशी, म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी, एसटीने एकाच दिवशी ३९ कोटी ७५ लाख रुपये इतकं उत्पन्न मिळवत यंदाच्या वर्षातील सर्वोच्च कमाई नोंदवली आहे. या भरीव कामगिरीबद्दल परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे.

१८ ते २७ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. या कालावधीत पुणे विभागाने २० कोटी ४७ लाख रुपयांसह राज्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवले, तर त्यानंतर धुळे (१५ कोटी ६० लाख) आणि नाशिक (१५ कोटी ४१ लाख) विभागांनी आघाडी घेतली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एसटीचे उत्पन्न तब्बल ३७ कोटींनी वाढले आहे. प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवत आणि तांत्रिक अडचणींवर मात करत विभागांनी सातत्याने सेवा दिल्यानेच ही उल्लेखनीय वाढ शक्य झाल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिवाळीच्या काळात घरापासून दूर राहून सर्वसामान्य प्रवाशांची सोय करण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्याच प्रयत्नामुळे एसटीला नवसंजीवनी मिळाली आहे,” असे गौरवोद्गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.तथापि, ठरविण्यात आलेल्या उत्पन्नाच्या लक्षापर्यंत पोहोचण्यात महामंडळाला यंदाही अडचणींचा सामना करावा लागला. एप्रिल आणि मे वगळता मागील चार महिन्यांत एसटीला सातत्याने तोटा सहन करावा लागला असून, अवकाळी पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे १५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी प्रतिदिन ३४ कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवून एकूण १,०४९ कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न झाला; मात्र काही दिवस वगळता अपेक्षित उत्पन्न मिळविणे शक्य झाले नाही.

पुणे, बीड, अहमदनगर, अमरावती आणि बुलढाणा विभागांनी उल्लेखनीय वाढ नोंदवली असली, तरी सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि धाराशिव या विभागांनी अपेक्षित कामगिरी दाखवू न शकल्याने एकूण उत्पन्नावर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सातत्याने तोट्यात असलेल्या विभागांच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त करत मंत्री सरनाईक यांनी त्यांचे सखोल मूल्यमापन करण्याची सूचना केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तोटा टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, सेवा अधिक विश्वासार्ह आणि प्रवाशानुकूल कराव्यात, तसेच प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी परिणामकारकतेने पार पाडावी,” असा ठाम संदेश सरनाईक यांनी दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.