Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागेपल्लीतील ‘आशीर्वाद वसतिगृह’ विनापरवानगी!

९१ विद्यार्थ्यांचे प्रशासनाने केले पुनर्वसन; जिल्हाधिकारींच्या निर्देशानंतर कारवाई....

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी, दि. ४ : नागेपल्ली येथील ‘आशीर्वाद वसतिगृह’ हे कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय मागील अकरा वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी धाड टाकून तत्काळ कारवाई केली. या कारवाईत एकूण ९१ विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करण्यात आले असून त्यात ४८ मुली आणि ४३ मुले यांचा समावेश आहे.

ही मुले वसतिगृहातून हलवून मुलांना एकलव्य मॉडेल शाळा, अहेरी, तर मुलींना शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, खमनचेरू येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर वसतिगृह ‘आशीर्वाद हॉस्टेल’ या नावाने मागील अनेक वर्षांपासून नागेपल्ली येथे चालविले जात होते. या संस्थेची नोंदणी चेन्नई येथील एका ख्रिश्चन मिशनरी संस्थेच्या नावावर असल्याचे तपासात आढळले; परंतु यासंदर्भात जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, धर्मादाय आयुक्त किंवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाची नोंद नाही, हेही स्पष्ट झाले.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि अहेरी उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांच्या निर्देशानुसार तहसीलदार बालाजी सोमवंशी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू, बाल कल्याण समिती सदस्य दिनेश बोरकुटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत जताडे, तालुका संरक्षण अधिकारी महेंद्र मार्गोनवार आणि क्षेत्र कार्यकर्ता निलेश देशमुख यांच्या पथकाने वसतिगृहावर संयुक्त तपासणी मोहीम राबवली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तपासणीदरम्यान हे वसतिगृह पूर्णपणे विनापरवानगी व अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रशासनाने प्रभारी पोलिस निरीक्षक मंगेश वळवी, महिला उपनिरीक्षक करुणा मोरे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना पोलिस वाहनांद्वारे सुरक्षित स्थळी हलविले.

विशेष म्हणजे, या वसतिगृहाच्या वरच्या मजल्यावर ‘चर्च हॉल’ असल्याचे तपासात उघड झाले. तिथे दररोज प्रार्थना घेतली जात असून, काही दिवसांपूर्वी ‘ख्रिस्तामध्ये तुमची ओळख काय?’ या विषयावर युवा मेळावा आयोजित करण्यात आल्याचेही प्रशासनाला समजले. या कार्यक्रमास परिसरातील अनेक गावांतील नागरिक उपस्थित होते, तसेच धार्मिक पुस्तकं व ख्रिश्चन साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

यामुळे प्रशासनाने उपस्थित केले आहे की — विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या वसतिगृहात धार्मिक कार्यक्रम कसे भरवले गेले? लहान मुलांसाठी धर्मप्रचारक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यामागे उद्दिष्ट काय? आणि इतक्या वर्षांपासून हे वसतिगृह कोणत्याही शासकीय नोंदणीशिवाय कसे चालविले गेले?

दरम्यान, जिल्हा बाल कल्याण समिती या वसतिगृहाची उद्या प्रत्यक्ष पाहणी करणार असून, यानंतर पुढील प्रशासकीय कारवाई काय होते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

 “मागील ११ वर्षांपासून नागेपल्ली येथे हे वसतिगृह सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही घटनास्थळी धाड टाकून सर्व दस्तऐवजांची तपासणी केली असता, कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा नोंदणीचा पुरावा आढळला नाही. जोपर्यंत या वसतिगृहाला महाराष्ट्र शासनाची वैध परवानगी मिळत नाही, तोपर्यंत येथे कोणत्याही विद्यार्थ्याला राहू देण्यात येणार नाही,”

ज्योती कडू

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली,

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.