Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला १५ दिवसांत घर खाली करण्याचे आदेश

गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांना दिला कायदेशीर आधार...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 गोंदिया : शहरातील गौतमनगर परिसरात वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरिक त्रास देत घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणाने कठोर भूमिका घेत संबंधित मुलाला १५ दिवसांच्या आत घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमनगर बाजपेयी वॉर्ड परिसरातील कौशल्या हरिराम मंदारकर (वय ७९) आणि हरिराम धाडू मंदारकर (वय ८६) हे आपल्या स्वमालकीच्या घरात वास्तव्यास होते. संबंधित घर हे कौशल्या मंदारकर यांच्या नावावर असून, वृद्धापकाळात शांततेने आयुष्य व्यतीत करण्याची त्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यांचा मुलगा दिनेश मंदारकर हा वारंवार मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत असल्याचे समोर आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सततची शिवीगाळ, धमक्या आणि कौटुंबिक वाद यामुळे वृद्ध दाम्पत्याचे जीवन असह्य झाले होते. मोठ्या भावासोबत झालेल्या वादानंतर संतापाच्या भरात दिनेश मंदारकर याने आई-वडिलांना घराबाहेर काढत त्यांच्या वस्तूही बाहेर फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, वृद्ध दाम्पत्याला दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला.

या घटनेनंतर हरिराम मंदारकर यांनी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत न्याय मिळवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला. सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या स्वमालकीचे असल्याचे स्पष्ट करत, मुलाला त्यांच्या इच्छेविरुद्ध घरात राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचे नमूद केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच, ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या घरात सन्मानाने आणि सुरक्षितपणे राहण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मुलाला १५ दिवसांच्या आत घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने घेतलेली ठाम भूमिका अधोरेखित झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.