Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतिदुर्गम बामणीत गडचिरोली पोलिसांचे आरोग्यदूत अभियान

१७० नागरिकांची आरोग्य तपासणी; पोलिसांच्या उपक्रमातून दुर्गम भागाला वैद्यकीय आधार....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या आरोग्य अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून उपपोस्टे बामणी येथे गडचिरोली पोलीस दल आणि शालिनीताई मेघे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे १७० नागरिकांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार व आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश दुर्गम भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, विविध आजारांबाबत जनजागृती करणे आणि उपचारांपर्यंत पोहोच निर्माण करणे हा होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिबिरात शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर येथील डॉ. भाऊराव नाखले, डॉ. रितिक राज दास, डॉ. रुद्रप्रसाद कोरवी तसेच वैद्यकीय कर्मचारी राहुल कुमरे यांच्या पथकाने नागरिकांची तपासणी केली. विविध आजार, पोषण समस्या आणि आरोग्यविषयक तक्रारींची तपासणी करून नागरिकांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. यावेळी गंभीर उपचारांची आवश्यकता असलेल्या १८ नागरिकांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे संदर्भित करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली पोलीस दलाने सन २०२१ पासून राबविलेल्या विविध आरोग्य उपक्रमांमधून आतापर्यंत तब्बल ४२ हजार ५०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियांसारख्या उपक्रमांमधून हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागांमध्ये केवळ सुरक्षा नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिकाही प्रभावीपणे पार पाडण्याचा प्रयत्न गडचिरोली पोलीस दलाकडून सातत्याने होत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे बामणीचे अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.