रस्ते अपघातातील पीडितांच्या स्मरणार्थ वॉकेथॉन गडचिरोलीत रस्ता सुरक्षा जनजागृतीचा ठसा; तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १५: रस्ते अपघातातील पीडितांना अभिवादन आणि सुरक्षित वाहतूक संस्कृतीबाबत समाजमनात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आज वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. जागतिक रस्ता अपघात पीडित स्मरण दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या उपक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि विविध संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी ८ वाजता आयटीआय चौक, नवेगाव पेट्रोल पंप परिसरातून वॉकेथॉनला सुरुवात झाली. “रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी”, “सेफ ड्राईव्ह – सेव्ह लाईफ”, “जीवन अमूल्य आहे, नियमांचे पालन करा” अशा प्रभावी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात, हा संदेश जनमानसात दृढ करण्यावर यंदाच्या उपक्रमात विशेष भर देण्यात आला.
वॉकेथॉनचे मार्गक्रमण शहरातील प्रमुख मार्गांवरून होत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे संपन्न झाले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी, स्थानिक नागरिक तसेच आयटीआय संस्थेतील २०० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. तरुण पिढीला रस्ता सुरक्षेचे महत्त्व जाणवून देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून प्रभावीपणे साध्य झाल्याचे प्रत्यक्ष अनुभूतीतून स्पष्ट झाले.
उपक्रमानंतर विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा संदेश असलेली वह्या आणि जनजागृतीपर विशेष टोप्या वाटप करण्यात आल्या. या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन हे केवळ कायदेशीर बंधन नसून नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, यावरही पुनरुच्चार करण्यात आला.
गडचिरोलीत रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता अशा उपक्रमांची आजच्या काळात अधिक गरज भासत आहे. वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘सुरक्षित रस्ते–सुरक्षित जीवन’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून होत असून, पुढील काळात जनजागृती कार्यक्रमांना आणखी गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

