“ग्रामीण कलावंतांसाठी प्रेरणादायी उपक्रम – मोफत शास्त्रीय संगीत प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न”
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि कलात्मक चळवळीला नवी ऊर्जा देण्याच्या उद्देशाने जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, येनापूर तर्फे एक भव्य व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कलावंत, युवक, युवती, महिला व लहान मुलांमध्ये कला विकासाची ओढ निर्माण व्हावी, त्यांना योग्य दिशा मिळावी आणि संगीताच्या माध्यमातून मानसिक समृद्धी साधता यावी या हेतूने संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीताताई बंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत तीन महिन्यांचे मोफत शास्त्रीय संगीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 22 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उद्घाटक म्हणून सपनाताई मंडल, शिवसेना शिंदे गट महिला आघाडी जिल्हा प्रमुख यांनी उपस्थिती दर्शवली. तर अध्यक्ष म्हणून काशिनाथ देवगडे सदस्य बाल कल्याण समिती गडचिरोली, प्रमुख अतिथी म्हणून सोमनाथ पवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन आष्टी, असित मिस्त्री जिल्हा प्रमुख बंगाली आघाडी शिवसेना, सुनीताताई बंडावार अध्यक्षा जनहित ग्रामीण विकास बहुऊदेशीय संस्था येणापूर, राजूभाऊ आत्राम माजी जिल्हा परिषद सदस्य, मनमोहन बंडावार माजी उपसभापती पंचायत समिती चामोर्शी, राजुभाऊ येगलोपवार सामाजिक कार्यकर्ते, पिंकी सरकार शिवसेना महिला तालुका प्रमुख चामोर्शी, सुरेश गुंतीवार सामाजिक कार्यकर्ते, सत्यपाल कुत्तरमारे शिवसेना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गडचिरोली, लुकेश देशमुख संगीत शिक्षक, सुरेश चोखारे, हनुजी कन्नाके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संगीत आणि मानसिक आरोग्य यातील महत्त्वपूर्ण नात्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. “मानसिक आजारांतून 90 टक्के आजार उद्भवतात. अशा मानसिक तणावांना कमी करण्यासाठी संगीत हा उत्तम उपाय आहे. शास्त्रीय संगीत शिकल्याने व्यक्तिमत्त्वातील अस्थिरता कमी होते आणि सकारात्मकतेचा पाया मजबूत होतो,” असे मत काशिनाथ देवगडे यांनी व्यक्त केले.
या शिबिराचा मुख्य हेतू ग्रामीण कलावंतांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ग्रामीण परिस्थितीत आजही अनेक कलावंतांकडे कला असूनही त्यांना सादरीकरणाची संधी मिळत नाही. अशा कलाकारांना प्रोत्साहन, प्रेरणा आणि प्रशिक्षण देण्याचा उद्देश या शिबिरातून साधला जात आहे, असे जिल्हा रक्तदूत रविंद्र बंडावार यांनी प्रास्ताविकेतून व्यक्त केले.
हा उपक्रम पूर्णतः मोफत असून तबला, हार्मोनियम व शास्त्रीय गायन या तीन विषयांमध्ये अनुभवी संगीत प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. संगीत शिक्षणामुळे युवकांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. भविष्यात या शिबिरातून उदयास येणारे कलाकार गावोगावी सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात मोलाचा वाटा उचलतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र बंडावार यांनी केले. शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने कार्यक्रमाचे संचालन रवींद्र जक्कुलवार (कोशाध्यक्ष) यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव बुरमवार (सदस्य) यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहुलभाऊ येगलोपवार, संदीप कुरवटकर, लालाजी वाकुडकर, रामकृष्ण झाडे (ग्राम रक्तदूत मुधोली तुकूम), आकाश जक्कुलवार, स्वप्नील गोर्लावार, गणेश गोपवार, आकाश बंडावार यांनी विशेष परिश्रम घेतले.

