बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत तावाडे यांचे अपघाती निधन; आलापल्ली येथे चक्काजाम, न्यायाच्या मागणीवर ठाम भूमिका..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चूनारकर आलापल्ली: गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले फुले–शाहू–आंबेडकर व मान्यवर कांशीराम यांच्या विचारधारेतील ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते गणपतजी तावाडे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर आलापल्ली येथे तीव्र संताप व्यक्त होत असून, बहुजन समाज पार्टीसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी चक्काजाम आंदोलन केले आहे.
दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी आलापल्लीतील वीर बाबुराव शेडमाके चौक परिसरात रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असताना मागून आलेल्या पोलीस शिपाई या पदावर कार्यरत असलेले दुचाकीस्वार यांनी गणपत तावाडे यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रथम चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात, त्यानंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.

पार्थिव आलापल्ली येथे आणताच नागरिकांचा संताप उफाळून आला. न्याय मिळेपर्यंत पार्थिव न उचलण्याचा निर्धार करत आंदोलनकर्त्यांनी मुख्य चौकात ठिय्या आंदोलन व चक्काजाम सुरू केला. यामुळे आलापल्ली व परिसरातील चारही बाजूंची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.

आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २० लाख रुपयांची आर्थिक मदत, तसेच एका मुलाला नोकरीवर घेण्यात यावी आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने अटक व कठोर कारवाईची मागणी केली आहे. गडचिरोलीसारख्या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात मद्यप्राशन करून अपघात घडल्याचा गंभीर आरोप होत असून, यामुळे पोलीस यंत्रणेविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

या आंदोलनात गणपत तावाडे यांच्या पत्नी स्वतः सहभागी होत मुख्य चौकात ठिय्या आंदोलनात बसल्या आहेत. “न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. नक्षलग्रस्त व संवेदनशील परिसर लक्षात घेता पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त वाढवला असून संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
आर्थिकदृष्ट्या साध्या परिस्थितीतूनही सामाजिक व बहुजन चळवळीत आयुष्यभर सक्रिय राहिलेले गणपत तावाडे हे प्रामाणिक, निष्ठावान आणि विचारांनी परिपक्व कार्यकर्ते म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीतील एक ठाम आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

