जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २० : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रासह मतदान यंत्रांच्या सुरक्षा कक्षांची (स्ट्राँग रूम) सविस्तर पाहणी केली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ईव्हीएम साठवणूक कक्षातील प्रवेश-निर्गम व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी प्रणाली, २४ तास सुरक्षा रक्षकांची तैनाती, अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच स्ट्राँग रूमभोवतीची बहिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तपासली. मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी, अडथळा किंवा गैरप्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच मतमोजणीच्या दिवशी कृषी महाविद्यालय परिसरातील बाह्य सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, प्रवेश व्यवस्थापन, उमेदवार व प्रतिनिधींची हालचाल तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचाही त्यांनी आढावा घेतला. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व शांततेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या पाहणीवेळी गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्यासह पोलीस, महसूल व निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, उद्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

