गडचिरोलीला ‘महाराष्ट्राचे प्रवेशद्वार’ आणि ‘स्टील हब ऑफ इंडिया’ म्हणून विकसित करण्याचा ठाम निर्धार आहे.
गडचिरोलीत ‘युआयटी’चा ऐतिहासिक प्रारंभ... मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गेल्या अनेक दशकांपासून माओवाद, दुर्गमता आणि मागासलेपणाची ओळख लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्याने आज विकासाच्या नव्या पर्वात ठाम पाऊल टाकले. गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक–खाजगी भागीदारीत अडपल्ली येथे स्थापन झालेल्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाने गडचिरोलीच्या भविष्यातील शिक्षण, रोजगार आणि औद्योगिक विकासाची दिशा स्पष्ट केली.
उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राचा शेवटचा आणि सर्वात मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीला गेल्या दहा वर्षांत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. आज शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून या जिल्ह्याची नवी ओळख घडते आहे. येत्या काही वर्षांत माओवाद ही केवळ इतिहासाची नोंद उरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण) व शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘इनोव्हेशनशिवाय प्रगती शक्य नाही,’ असे स्पष्ट करत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी उद्योग आणि शिक्षण यांचा समन्वय साधणाऱ्या या संस्थेमुळे गडचिरोलीत भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ निर्माण होईल, असे नमूद केले. लॉयड्स मेटल्सकडून संस्थेसाठी करण्यात आलेली 25 कोटी रुपयांची गुंतवणूक, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, निवास, प्रशिक्षण व रोजगाराची हमी देणारी व्यवस्था ही या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये ठरली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, गडचिरोलीतील खनिज संपत्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक होत असून त्यातून लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. मात्र, ही गुंतवणूक स्थानिक तरुण-तरुणींनाच संधी देणारी ठरावी, यासाठी UATI सारख्या संस्थांची आवश्यकता होती. उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाचे कौशल्य निर्माण करणारा हा उपक्रम गडचिरोलीच्या परिवर्तनाचा पाया ठरेल.
तंत्रज्ञान शिक्षण, उद्योग–अकॅडेमिया भागीदारी आणि आदिवासी भागातील तरुणांसाठी खुल्या झालेल्या नव्या संधींमुळे गडचिरोली आता केवळ महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा न राहता विकासाचा नवा प्रवेशद्वार ठरण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हेच या उद्घाटन सोहळ्याने अधोरेखित केले.

