Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेझिंग डे सप्ताहानिमित्त गडचिरोलीत शिस्तबद्ध पोलीस पथसंचलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि,०२ : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारीदरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेझिंग डे सप्ताहाच्या प्रारंभी गडचिरोली पोलीस दलातर्फे शुक्रवारी सकाळी शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या उपस्थितीत हे पथसंचलन पार पडले.

कारगील चौक येथून प्रारंभ झालेल्या या पथसंचलनाची सांगता इंदिरा गांधी चौक येथे झाली. पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. वाहतूक शिस्त, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा तसेच सामाजिक जनजागृतीसंदर्भातील फलकांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रेझिंग डे सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपपोस्टे व पोलीस मदत केंद्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन, पोलीस दलाच्या कार्यपद्धतीविषयी माहिती, सायबर गुन्हे व महिला सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता अभियान तसेच इतर सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे.

पथसंचलनात ध्वजवाहक पथक, महिला प्लाटून, विशेष अभियान पथक, बँड पथक, श्वान पथक, बीडीडीएस पथक, एमपीव्ही वाहनांसह विविध शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, सिव्हीक अॅक्शन, सायबर सेल, भरोसा सेल आदी शाखांनी शिस्तबद्ध पथसंचलन सादर केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, पोलीस उपअधीक्षक (गृह) स्वप्निल ईज्जपवार, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. तसेच गडचिरोली शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी पथसंचलनात सहभाग नोंदविला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.