Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवा आदेश, नवा कार्यभार; गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदाची धुरा डॉ. रवि गावंडेंकडे

डॉ. छाया उईके यांच्याकडील कार्यभाराचा आदेश रद्द; नागभीडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि गावंडे यांच्याकडे प्रशासकीय व वित्तीय जबाबदारी..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्या निलंबनानंतर गडचिरोलीच्या आरोग्य प्रशासनाच्या प्रमुख पदाच्या कार्यभाराबाबत आरोग्य विभागाने पुन्हा फेरबदल केला आहे. डॉ. छाया बाबुराव उईके यांच्याकडे सोपविण्यात आलेला अतिरिक्त कार्यभाराचा आदेश रद्द करून आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि नागोराव गावंडे यांच्याकडे गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळाचे डॉ. शशिकांत शंभरकर यांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी सुधारित आदेश जारी केला. या आदेशानुसार डॉ. गावंडे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा प्रशासकीय तसेच वित्तीय कार्यभार पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १६ सप्टेंबर रोजीच्या शासन आदेशानुसार डॉ. वर्षा लहाडे यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. छाया उईके यांच्याकडे देण्याचा आदेश नागपूर मंडळाच्या आरोग्य विभागाकडून काढण्यात आला होता. मात्र, हा आदेश आता रद्द करण्यात आला असून त्याऐवजी डॉ. रवि गावंडे यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचा सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन आदेशानुसार डॉ. गावंडे यांनी गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा प्रशासकीय व वित्तीय कार्यभार स्वीकारून त्याबाबतचा अनुपालन अहवाल उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ तसेच संबंधित कार्यालयांना सादर करायचा आहे.

दरम्यान, डॉ. छाया उईके यांना त्यांच्याकडील प्रशासकीय व वित्तीय कार्यभार डॉ. गावंडे यांच्याकडे हस्तांतरित करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्य विभागात पुन्हा प्रशासकीय फेरबदल….

विशेष म्हणजे, डॉ. लहाडे यांच्या निलंबनानंतर कार्यभाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजीच आधीचा आदेश काढण्यात आला आणि त्यानंतर तो रद्द करून सुधारित आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार आता डॉ. रवि गावंडे यांच्याकडे राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.