डॉ. दिवाकर मारकवार यांचे निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कॉ. अमोल मारकवार यांचे वडील, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिवाकर मारकवार यांचे आज शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजता उपचारादरम्यान निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
डॉ. दिवाकर मारकवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावली. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, रुग्णांशी आपुलकीने वागणारे, दिलखुलास स्वभावाचे आणि कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
वृद्धापकाळामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १.०० वाजता आरमोरी येथील गाढवी नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा कॉ. अमोल मारकवार, एक मुलगी, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
डॉ. दिवाकर मारकवार यांच्या निधनाने जिल्ह्यातील वैद्यकीय, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

