Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खडकी गावात घरातून बिबट्याने उचललेल्या चार वर्षीय आदित्यचा दुर्दैवी मृत्यू

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

तिरोडा (गोंदिया) :

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी गाव आज एका हृदयद्रावक घटनेमुळे शोकसागरात बुडाले आहे. आज सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास बिबट्याने थेट मानवी वस्तीत घुसून घरात बसलेल्या चार वर्षीय आदित्यवर हल्ला करत त्याला उचलून नेले. काही क्षणांतच घडलेल्या या भीषण घटनेत आदित्यचा दुर्दैवी मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य आपल्या आई-वडिलांसोबत घरातच बसलेला होता. वातावरण नेहमीप्रमाणे शांत असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक घरात प्रवेश केला आणि क्षणाचाही विलंब न करता चिमुकल्यावर झडप घातली. आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याने आदित्यला उचलून नेल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला.

घटनेनंतर गावकऱ्यांनी आरडाओरड करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. नागरिकांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच काही अंतरावर बिबट्याने आदित्यला रस्त्यावर सोडून दिले. मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. निष्पाप बालकाचा निश्चल देह पाहून खडकी गावात शोककळा पसरली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात होत असलेले अपयश याबाबत ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, पिंजरे लावावेत, तसेच परिसरात रात्रकालीन गस्त वाढवावी, अशी ठोस मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये मानवी जीवन आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, खडकीतील ही घटना प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.

आदित्यचा अकाली गेलेला जीव केवळ एका कुटुंबाचे दु:ख नसून, संपूर्ण परिसरासाठी अंतर्मुख करणारा इशारा आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संघर्ष थांबवण्यासाठी ठोस, प्रभावी आणि तातडीच्या उपाययोजना राबवण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.