Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घोट जंगलात सागवान तस्करीचा भांडाफोड

१९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच आरोपी पसार...

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आलापल्ली वनविभागाच्या घोट वनपरिक्षेत्रात छत्तीसगडमध्ये सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या वाहनावर वनविभागाच्या पथकाने कारवाई करून ४ लाख ८ हजार ९४९ रुपये किमतीचे सागवान लाकूड आणि १५ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन जप्त केले. एकूण १९ लाख ८ हजार ९४९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, वाहनातील दोघांसह दुचाकीवरील तिघे असे पाच आरोपी पसार झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दि. १० च्या मध्यरात्री घोट वनपरिक्षेत्रातील गरंजी परिसरात वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे हे पथकासह गस्तीवर असताना एक मालवाहू वाहन (क्रमांक CG-07-CT-6735) व एक दुचाकी संशयास्पदरीत्या जाताना दिसली. तपासणीसाठी थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहनचालकाने वेग वाढवत कोटमीच्या दिशेने पळ काढला. वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून काही अंतरावर वाहन अडविले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाहन थांबताच मालवाहूतील दोघे आरोपी वाहन सोडून पसार झाले, तर त्यांच्या सोबत असलेले दुचाकीवरील तिघेही अंधाराचा फायदा घेत निसटले. वाहनाची तपासणी केली असता वरच्या बाजूला प्लास्टिक भंगाराच्या चुंगळ्या, तर त्याखाली सागवान प्रजातीचे १३ ओंडके लपवून ठेवलेले आढळून आले. तपासणीत या लाकडांचे प्रमाण ३.४२७ घनमीटर असल्याचे स्पष्ट झाले.

सागवान लाकडांची किंमत ४ लाख ८ हजार ९४९ रुपये, तर जप्त मालवाहू वाहनाची किंमत सुमारे १५ लाख रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले. जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी घोट वनपरिक्षेत्र कार्यालयात ठेवण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकरणाचा तपास आलापल्लीच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले व प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे करीत आहेत. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असून, जप्त सागवान नेमका कोणत्या जंगलातून कापण्यात आला, याचाही तपास केला जात आहे.

या कारवाईत क्षेत्र सहाय्यक व्ही. एम. ठाकरे, वनरक्षक एन. व्ही. गावडे, जी. सी. राठोड, एस. बी. राठोड, एस. पी. धानोरकर, मंगेश काबेवार, कमलाकर चौधरी, वाहन चालक वनरक्षक प्रवीण श्रीखंडे, तसेच आलाम व जीवन बिटपल्लीवार यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, आलापल्ली वनविभागाच्या हद्दीत अवैध वृक्षतोड, लाकूड तस्करी किंवा अन्य वनगुन्ह्यांची माहिती असल्यास तात्काळ वनाधिकारी अथवा वनकर्मचाऱ्यांना कळवावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. वाडीघरे यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.