Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर.डी.च्या बहाण्याने घराबाहेर पडला… जंगलात अखेर रक्ताने माखलेला मृतदेह सापडला!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : “कामासाठी बँकेत जातो,” असे सांगून घराबाहेर पडलेला माणूस दुसऱ्या दिवशी जंगलात मृतावस्थेत सापडतो, तेव्हा तो केवळ गुन्हा राहत नाही, तर संपूर्ण समाजमन हादरवणारी घटना ठरते. अहेरी तालुक्यात रविवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या रवींद्र तंगडपल्लीवार (४९, रा. नागेपल्ली) यांचा सोमवारी सकाळी निर्घृण हत्येनंतरचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रवींद्र तंगडपल्लीवार हे आर.डी. जमा करण्याचे काम करीत होते. रविवारी दुपारी प्रगती बँकेत जात असल्याचे सांगून ते घरातून निघाले. काही वेळातच त्यांचा मोबाईल बंद झाला. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईक आणि मित्रांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र काहीही धागेदोरे मिळाले नाहीत.

सोमवारी सकाळी आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-३५३सी) परिसरात पुन्हा शोध सुरू असताना, नागमंदिराजवळील जंगलात — महामार्गापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर — त्यांचा मृतदेह आढळून आला. आलापल्लीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ही थरारक घटना उघडकीस आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मृतदेहावरील जखमा पाहता अंगावर काटा येतो. डोक्यावर आणि शरीरावर अत्यंत क्रूर हल्ल्याचे स्पष्ट चिन्ह, एका हाताचे पूर्ण बोट छाटलेले, तसेच तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे ठळकपणे दिसून येते. मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची छोटी बाटली सापडल्याने हत्या नियोजित होती की अचानक घडली, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत.

या घटनेमुळे आलापल्ली–नागेपल्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “उद्या कोण?” असा सवाल सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून, एका क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांचा पथक घटनास्थळी दाखल झाले. हत्या नेमकी का झाली, आरोपी कोण, आणि या क्रूरतेमागचे सत्य काय — याचा कसून तपास सुरू असून, या खुनाने अहेरी तालुक्याची शांतता हादरून गेली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.