अंतिम संस्कारासाठी जाताना कार दीना नदीत कोसळली; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर — पार्श्वभूमीला निर्घृण खून प्रकरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या आलापल्ली येथे आज शोकाकुल वातावरणात घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृतक हे नातलग असल्याने झाल्या त्या घटनेनंतर अंतिम संस्कारासाठी निघालेल्या आष्टी येथील नातलगांच्या कारला चंद्रपूर–आष्टी महामार्गावरील मुक्तापूर येथील दीना नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन थेट दीना नदीत कोसळले. कारमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला व तीन पुरुष असे पाच जण प्रवास करत होते.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनील मुरलीधर मुरलीधर कोलपाकवार (वय ६५, रा. बोरी, ता. अहेरी) आणि यादव कोलपाकवार (वय ६७) यांचा अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींमध्ये पद्मा सत्यनारायण कोलपाकवार (५५), अर्चना यादव कोलपाकवार (६०, रा. आष्टी, ता. चामोर्शी) आणि अभिजित यादव कोलपाकवार (३५) यांचा समावेश असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. सर्व जखमी एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीला काल घडलेले एक धक्कादायक खून प्रकरण समोर आले आहे. अल्लापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत नागमंदिराजवळ रवींद्र तंगडपल्लीवार (पेशा : आरडी व्यवसाय) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज त्यांचे अंतिम संस्कार असल्याने नातलग अंत्यविधीसाठी उपस्थित होते. अंतिम संस्कार आटोपून परत जात असतानाच ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व तसेच पोलीस अधिकारी , कर्मचारी तपास करीत आहेत.

