लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देव मार्कंडा मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेत यंदाही तंबाखू व दारूमुक्त वातावरण राखण्यात प्रशासनाला मोठे यश आले. मुक्तीपथ, प्रशासन आणि देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २.८४ लाख रुपये किमतीचा तंबाखू व दारूसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
यात्रेदरम्यान धार्मिक स्थळाचे पावित्र्य अबाधित राहावे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने ‘तंबाखू-दारूमुक्त यात्रा’चा नारा देण्यात आला. अनेक दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद ठेवली; तर नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.
भाविकांमध्ये जनजागृतीसाठी रॅली, पोस्टर्स आणि घोषणांचा प्रभावी वापर करण्यात आला. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी तंबाखू व दारूची प्रतीकात्मक ‘प्रेतयात्रा’ काढण्यात आली, जी यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली. व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारे मुखवटे आणि प्रात्यक्षिकांमुळे भाविकांचे लक्ष वेधले गेले. या माध्यमातून दारू आणि तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेत सुमारे २,२०,००० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ आणि ६४,००० रुपयांची दारू, असा एकूण २.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच २,२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून दारू विक्री करणाऱ्या चार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस विभाग, देवस्थान समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी, तंटामुक्ती समिती, मुक्तीपथ, शक्तीपथ महिला गट, स्पार्क कार्यकर्ते, देवतळे महाविद्यालयाचे स्वयंसेवक व शिक्षक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. बसस्थानक परिसरात सर्व विभागांच्या उपस्थितीत मोहिमेची सांगता करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासन आणि मुक्तीपथच्या समन्वित प्रयत्नांमुळे मार्कंडा यात्रा व्यसनमुक्त राखण्यात यश आले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता भाविकांना शांततेत आणि समाधानाने दर्शन घेता आले.


Comments are closed.