Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युद्धाच्या सावटात गडचिरोलीकर दुबईत अडकले; मायदेशी परतीसाठी प्रशासनाकडे धाव

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आखाती देशांतील हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून Dubai येथील विमानसेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील ‘हॉटेल रसिका’चे संचालक सुनील बुरेवार हे पत्नी मेघा, मुलगी मयुरा आणि मुलगा नील यांच्यासह दुबईत अडकले आहेत. सुरक्षितपणे मायदेशी परतण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीची आर्त विनंती केली आहे.

सुनील बुरेवार कुटुंब २५ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. नियोजनानुसार ५ मार्च २०२६ रोजी Hyderabad मार्गे Nagpur येथे परतण्याचे त्यांचे आरक्षण होते. मात्र मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र झाल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. परिणामी त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या हे कुटुंब दुबईतील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली असली, तरी सततच्या युद्धजन्य घडामोडी, रद्द होणारी उड्डाणे आणि अनिश्चिततेचे वातावरण यामुळे मानसिक ताण वाढला आहे. “आम्ही सुरक्षित आहोत; परंतु उड्डाणे रद्द होणे आणि सातत्याने येणाऱ्या बातम्यांमुळे भविष्यासंदर्भात भीती वाटते,” असा संदेश नील बुरेवार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. मुक्कामाचा पत्ता, पासपोर्ट व प्रवासाचे तपशील देत केंद्र व राज्य शासनाने हस्तक्षेप करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी त्यांनी विनंती केली आहे.

दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या प्रकरणाची दखल घेत राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाशी तसेच Ministry of External Affairs यांच्याशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुबईतील Embassy of India, Abu Dhabi तसेच संबंधित वाणिज्य दूतावासामार्फत आवश्यक ती मदत व मार्गदर्शन मिळावे, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघर्षाचा फटका थेट एका सर्वसामान्य गडचिरोलीकर कुटुंबाला बसल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. आता प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपातून बुरेवार कुटुंबाचा सुखरूप परतीचा मार्ग मोकळा होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.