Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जेएसडब्ल्यू प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे मुंडण आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले

चामोर्शीतील १४ गावांचा निर्धार – अधिसूचना रद्द न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा...

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : प्रस्तावित जेएसडब्ल्यूच्या लोहप्रकल्पासाठी शासनाकडून सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीव्र संताप व्यक्त करत मुंडण आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या अभूतपूर्व एकजुटीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून गेला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन घेणार नाही, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असले तरी जमीन अधिग्रहणासंदर्भातील अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

चामोर्शी औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ७ अंतर्गत भेंडाळा परिसरातील १४ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ भेंडाळा, घारगाव, रामाळा, फोकुर्डी, वाघोलीसह परिसरातील गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलनकर्त्यांनी मनोज पोरटे यांच्या नेतृत्वात सामूहिक मुंडण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हजारो शेतकऱ्यांनी भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या आंदोलनाला सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचाही पाठिंबा लाभला. हरणघाट येथील मुरलीधर महाराज यांनी आंदोलनाला उपस्थिती लावली. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी स्वतः मुंडण करून शासनाच्या अधिसूचनेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्याच्या लढ्यात शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनाला माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अमोल गण्यारपवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.