Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत पोलीस भरतीची लेखी परीक्षा पारदर्शकतेच्या कसोटीवर यशस्वी

७१७ पदांसाठी ९९.५४% उपस्थिती; अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कडेकोट बंदोबस्तात परीक्षा संपन्न..

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, : जिल्हा पोलीस दलाच्या २०२४-२५ या भरती प्रक्रियेअंतर्गत (प्रत्यक्ष भरती २०२६) पोलीस शिपाई पदासाठी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा आज अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. एकूण ७१७ पदांसाठी होत असलेल्या या भरतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना, प्रशासनाने काटेकोर नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही परीक्षा निर्विघ्न पार पाडली.

या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ७००३ उमेदवारांपैकी तब्बल ६९७१ उमेदवारांनी हजेरी लावली, म्हणजेच ९९.५४ टक्के उपस्थिती नोंदवली गेली. ही आकडेवारीच या भरती प्रक्रियेबद्दल उमेदवारांमध्ये असलेल्या विश्वासाची आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेची साक्ष देणारी ठरली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यापूर्वी १४ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचण्या पार पडल्या होत्या. त्या चाचण्यांतील गुणांच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी आज सकाळी १० वाजता लेखी परीक्षेची सुरुवात झाली. पहिला पेपर ‘सामान्य अध्ययन’ विषयाचा सकाळी १० ते ११.३० दरम्यान, तर दुसरा पेपर ‘गोंडी व माडीया’ भाषाविषयक दुपारी १ ते २.३० या वेळेत घेण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली शहरातील एकूण १४ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी १६६ पोलीस अधिकारी, ६९३ पोलीस अंमलदार आणि १३२ शिक्षक व मंत्रालयीन कर्मचारी असे एकूण सुमारे १००० मनुष्यबळ कार्यरत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उभारलेली सुरक्षा यंत्रणा ही परीक्षेच्या गांभीर्याची जाणीव करून देणारी ठरली.

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रवेशद्वारावरच उमेदवारांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करूनच उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. काही संवेदनशील केंद्रांवर सिग्नल जॅमरचा वापर करून कॉपी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना पूर्णतः आळा घालण्यात आला.

उमेदवारांच्या सोयीसाठी गडचिरोली पोलीस दलाने तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर केला. प्रत्येक परीक्षा केंद्राचे गुगल मॅप लोकेशन, बैठक व्यवस्था आणि आवश्यक सूचना सोशल मीडियावर वेळोवेळी प्रसारित करण्यात आल्या. त्यामुळे दुर्गम भागातून आलेल्या उमेदवारांनाही केंद्र गाठणे सुलभ झाले. दोन पेपरदरम्यान उमेदवारांसाठी नाश्त्याची व्यवस्था करून प्रशासनाने संवेदनशीलतेचा परिचय दिला.

विशेष म्हणजे, परीक्षा पार पडल्यानंतर केवळ काही तासांतच दुपारी ३.१५ वाजता दोन्ही पेपरच्या उत्तरपत्रिका गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या. उमेदवारांना पारदर्शकतेचा पूर्ण विश्वास देण्यासाठी आक्षेप नोंदविण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांना अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज, तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि विविध उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोठी प्रशासकीय जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.