गडचिरोलीत नक्षलवादाला जबरदस्त धक्का; ९ वरिष्ठ माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण.. तीस लाखाची होते बक्षीस..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधून कार्यरत असलेल्या ३ एसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह एकूण ९ नक्षल सदस्यांनी आज गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले. या सर्व माओवाद्यांवर मिळून ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, आत्मसमर्पण करताना काही माओवाद्यांनी एके-४७ आणि कार्बाईनसारखी घातक शस्त्रेही सोपवली आहेत. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे नक्षल चळवळ आता कोलमडत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आज ३१ मार्च रोजी ९ माओवादी सदस्यांनी अधिकृतपणे आत्मसमर्पण केले. यामध्ये ३ एसीएम दर्जाचे वरिष्ठ नक्षलवादी असून, त्यांनी अनेक वर्षे नक्षल चळवळीत सक्रिय भूमिका बजावली होती. आत्मसमर्पणावेळी एके-४७ रायफल, कार्बाईन आणि जिवंत काडतुसेही पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली. आत्मसमर्पित माओवाद्यांनी दिलेल्या माहितीवरूनमहाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर लपवून ठेवलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात एसएलआर रायफल, डेटोनेटर, काडतुसे आणि संप्रेषण साहित्याचा समावेश आहे.
गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त मोहिमेमुळे नक्षलवाद्यांमध्ये आत्मसमर्पणाची लाट निर्माण झाली आहे. २०२५ पासून आतापर्यंत १३२ माओवाद्यांनी शस्त्रे टाकली असून, २००५ पासून हा आकडा ८०५ वर पोहोचला आहे.कधीकाळी जिल्ह्यातील१०उपविभागांमध्ये सक्रिय असलेली नक्षल चळवळ आता केवळ भामरागडच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

