Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार्जिंग वायरने प्रेयसीचा गळा आवळला; लिव्ह-इनचा थरारक अंत

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : दुर्गापूर शहरात सलग घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले असताना, एका थरारक हत्येने खळबळ उडवली आहे. आपल्या पेक्षा सात वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रेयसीचा मोबाइल चार्जिंग वायरने गळा आवळून खून करत, आत्महत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैद्यकीय अहवालामुळे आरोपीचा कट उधळला गेला आणि पोलिसांनी त्याला अखेर अटक केली.

अंकेश योगेश बहीरवार (२२, रा. सोनापूर, ता. सावली) असे आरोपी प्रियकराचे नाव असून, प्रियंका वांढरे (२९, रा. तुकूम) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रियंका पतीपासून विभक्त राहत होती. याच काळात तिची ओळख अंकेशशी झाली. वयाने सात वर्षांनी लहान असलेल्या अंकेशसोबत तिचे संबंध प्रेमात परिवर्तित झाले आणि दोघेही तिच्याच घराच्या वरच्या मजल्यावर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील नात्यात तणाव वाढत होता. क्षुल्लक कारणांवरून होणारे वाद हळूहळू गंभीर रूप धारण करू लागले. याच वादातून संतापाच्या भरात अंकेशने प्रियंकाचा गळा मोबाइल चार्जिंग वायरने आवळत तिचा खून केला. गुन्हा झाकण्यासाठी त्याने ही घटना आत्महत्या असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

परंतु, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ तपासाची दिशा बदलत आरोपीला अटक केली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लिव्ह-इन नात्यांमधील वाढता तणाव आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.