Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोल्हापुरात १० लाखाची रोख लाच स्वीकारतांना इनकम टॅक्स अधिकाऱ्याला रंगेहात अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: कोल्हापूर शहरातीललक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर १० लाखाची रोख लाच स्वीकारतांना इनकम टॅक्स अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दहा लाख रुपयांची लाच घेताना वरिष्ठ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या म्हणजेच ACB च्या जाळ्यात अडकला आहे. डॉक्टराविरुध्द आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दहा लाखाची लाच घेणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला कोल्हापुरात रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विल्सन पुलाजवळ अॅन्टीकरप्शन (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तक्रारदार  होमियोपॅथीक डॉक्टर असून त्यांनी डॉक्टरी पेशातून गैरमार्गानं प्रॉपर्टी मिळवल्याची तक्रार आयकर विभागाकडे आली होती. त्यानुसार आयकर निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण (वय 35) चौकशी करत होते. तक्रारदार यांच्याशी दोन दिवसापूर्वी त्यांनी संपर्क साधून चव्हाण यांनी संबंधित डॉक्टरांना टाकाळा येथील कार्यालयात भेटण्यास बोलवून घेतलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी अर्जदारांच्या विरुध्द प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत चर्चा करुन आणि तक्रारदारानं गेल्या 6 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्नस् भरले नसल्यानं 50 लाख रूपये दंड होणार असल्याचं सांगितलं. ती दंडात्मक कारवाई करावयाची नसल्यास 20 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 14 लाख रुपये रक्कम देण्याचं ठरलं.

याप्रकरणी तक्रारदारानं आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांच्याविरुद्ध कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीवरून पंच साक्षीदारांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता पडताळणीमध्ये आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांचेविरूध्द विल्सन पुल, शाहुपूरी, कोल्हापूर येथे सापळा रचून कारवाई केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रताप चव्हाण यांनी मागणी केलेल्या लाच रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून 10 लाख रूपये लाच रक्कम स्विकारल्यानं त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी चव्हाण यांच्याविरुद्द शाहूपूरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणेचे राजेश बनसोडे आणि अपर पोलिस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणेचे सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शाम बुचडे, संजीव बंबरगेकर, अजय चव्हाण, मयुर देसाई, रुपेश माने, संग्राम पाटील, सुरज अपराध, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी कारवाई केली. कोल्हापुरात ही मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे.

Comments are closed.