Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बच्चेकंपनीपुढे झाले मोकळे आकाश

प्रा. सुरेश चोपणे यांनी उलगडली अंतरीक्षांची रहस्ये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, ता. २८ : मोबाईलच्या दोन बाय दोनच्या स्क्रीनवर जखडलेली बच्चेकंपनीची नजर निसर्गाने दिलेल्या आकाशाच्या अनंत व विस्मयकारी स्क्रिनवर नेण्याचा यशस्वी प्रयत्न क्रेन्स  संस्थेच्या किलबिल नेचर क्लबने केला असून या क्लबद्वारे रविवारी (ता. २७) आयोजित कार्यक्रमात आपली अगणित गुपिते सांगत जणू आकाशच मोकळे झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

क्रेन्स संस्थेच्या किलबिल नेचर क्लबच्या वतीने स्थानिक पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत आयोजित आकाश दर्शन या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटन दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून खगोल, जीवाश्म आणि निसर्ग अभ्यासक तथा ग्रीन प्लॅनेट संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे उपस्थित होते. तसेच गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे , क्रेन्स संस्थेच्या सचिव तथा योगशिक्षिका अंजली कुळमेथे, वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक शेमदेव चाफले, पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे, मानसशास्त्रज्ञ शशिकांत शंकरपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके, प्राचार्य डॉ. संजय भांडारकर, वसंत विद्यालयाच्या शिक्षिका बिसेन आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात प्रा. सुरेश चोपणे यांनी आधी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्रांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये, महत्त्व, आकाश दर्शन कसे करावे, खगोलशास्त्र,  अंतराळ अभ्यास, या क्षेत्रातील संधी आदींची माहिती सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थी व उपस्थित अनेकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे देत त्यांचे शंकानिरसण केले. त्यानंतर सर्वांनी स्थानिक प्रेक्षागार मैदानावर प्रत्यक्ष जाऊन टेलिस्कोपच्या माध्यमातून आकाशात चंद्र, मंगळ,  मृग नक्षत्र, व्याधाचा तारा, रोहिणी नक्षत्र आदींसह काळ्याभोर आकाशात चमचमणा-या तारे, तारका, ग्रह, नक्षत्रांची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे या अनोख्या कार्यक्रमात बच्चेकंपनीसोबतच पालकही रममाण झाले होते. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याबद्दल सर्वच मान्यवरांनी कौतुक करत असे कार्यक्रम  नियमित घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमासाठी शरद डोके, खुशाल ठाकरे, अतीश उरकुडे तसेच शाळेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माहितीचा खजिना…

या कार्यक्रमात प्रा. सुरेश चोपणे यांनी बच्चेकंपनीपुढे अवकाशातील माहितीचा खजिनाच रिता केला. सूर्य, पृथ्वी व इतर ग्रहताऱ्यांची निर्मिती कशी झाली, आपली ग्रहमाला, आकाशगंगा, आकाशदर्शनाचा इतिहास, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या हबल व इतर अनेक अद्ययावत दुर्बिण, उपग्रहे, जगभरातील वेधशाळा, टेलिस्कोपचे विविध प्रकार, ग्रह, ताऱ्यांतील प्रकाशवर्षांचे अंतर, तारे निर्माण करणारे नेब्युला, अंतरिक्षातील सुपरनोवासारख्या अचंबित करणाऱ्या घटना, उल्कापिंडे, परग्रहवासींविषयीची मतमतांतरे, गुरू, शुक्र,  मंगळावरची प्रचंड वादळे, सौरलाटा, प्रकाशवर्षांचे अंतर, विश्वनिर्मितीची बिग बँग थेअरी, सोप्या पद्धतीने आकाश निरीक्षणासाठी उपयोगी पडणारे अ‍ॅप्स अशा अनेक बाबी त्यांनी सविस्तर सांगितल्या. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांना अतिशय ज्ञानसमृद्ध करणारा ठरला.

Comments are closed.