नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट, 24 तासात 500 नवे रुग्ण
पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर 12 फेब्रुवारी:- नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. तर दिवसभरात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे.
नागपूर जिल्ह्यात तब्बल 66 दिवसानंतर पुन्हा 24 तासांत 500 नवे रुग्ण आढळले आहेत. चार दिवसांत तब्बल 1 हजार 398 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 37 हजार 498 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11 लाख 4 हजार 522 जणांच्या तपासण्या झाल्या आहेत.
गेल्या 24 तासात नागपुरात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनामुळे एकूण मृत्यूसंख्या ही 4 हजार 315 वर पोहोचली आहे. नागपुरात अनेक ठिकाणी मास्कचा वापर नाही, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अनेक लोक कोव्हिडचे नियम पाळत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे


Comments are closed.