Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची आता जम्मूमध्ये शाखा

२६ फेब्रुवारीला स्वा. वि. दा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी खास कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २५ फेब्रुवारी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाला २६ फेब्रुवारी २०२१ यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांची जम्मूमध्ये शाखा सुरू केली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना सिंधु नदीपासून सिंधु सागरापर्यंत व्यापक करण्याचा उद्देश यामागे आहे.
 ‘ सिंधु नदी से सिंधु सागरतक स्वातंत्र्यवीरोंकी बात’ ( सिंधु नदीपासून ते सिंधु सागरापर्यंत विषय स्वातंत्र्यवीरांचाच!) अशा घोषवाक्याच्या उद्देशातून जम्मूमधील ही शाखा सुरू केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 स्वा. सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य अखंड भारताच्या निर्मितीसाठी वेचले. वयाच्या पंधराव्या वर्षी नाशिकनजीकच्या भगूर या आपल्या मूळ निवासस्थान असलेल्या गावामधून त्यांनी देशकार्याचा विडाच उचलला होता. त्यासाठी त्यांनी इतक्या यातना सहन केल्या की, पन्नास वर्षांच्या दुहेरी जन्मठेपेच्या शिक्षेलाही ते सामोरे गेले. अंदमानातील तुरुंगामध्ये अमानवी अशा छळालाही त्यांनी झेलले. अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्यापूर्वी भारताची फाळणी झाली होती. अर्थात त्या स्वातंत्र्याचेही स्वागत स्वा. सावरकर यांनी केले. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय म्हणजे सामाजिक एकता असेच ठेवले.

क्रांतिकार्यासाठी जगभरात स्वा. सावरकर यांनी फिरून तसेच भारताच्या सर्व भागात जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी  सभा घेतल्या. त्यांच्या या मोहिमांमध्ये जुलै १९४२ मध्ये त्यांनी जम्मूलाही भेट दिली होती. तेव्हा त्यांचे मोठे जल्लोषात स्वागत केले गेले. त्यावेळच्या राजानेही तेथे त्यांचे स्वागत केले, त्यांच्या कार्याची स्तुती केली होती. अशा या जम्मूसारख्या एका ऐतिहासिक ठिकाणी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या शाखेची स्थापना होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जम्मूमधील त्या भेटीला आता ७९ वर्षे होत असून या मोठ्या कालावधीत जम्मू- काश्मीरमध्ये मोठमोठे बदल झाले. काश्मिरी हिंदुंच्या क्रूर हत्याही झाल्या, दहशतवादी हल्लेही या जम्मू-काश्मीरने झेलले.  या दरम्यानच्या काळात ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी राज्यात लागू असणारे कलम ३७० आणि ३५ ए संपुष्टात  आणले गेले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या राज्यातील या विद्यमान जनतेला व त्यांच्या नव्या पिढीला देशाच्या मुख्य प्रवाहात सामावता यावे, बळकट करावे आणि भारताच्या ऐतिहासिक संपत्तीला समृद्ध  करता यावे या उद्दिष्टातून जम्मू येथे  स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईची शाखा सुरू करण्यात येत आहे.  जम्मूची ही शाखा सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे  कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह स्वप्निल सावरकर यांच्या उपस्थितीत स्थापन केली जाईल.

सावरकरांची तीन गाणी नव्या पिढीकडून सादर यानिमित्ताने स्वा. सावरकर यांची  दोन हिंदी गीते  नव्या स्वरूपात सादर केली आहेत. यू-ट्यूबवर ती प्रक्षेपित केली जाणार आहेत. यामध्ये  ‘जयोस्तुते’ हे आर्या आंबेकर यांनी गायले आहे तर ‘अनादी मी’ जयदीप वैद्य यांनी गायले आहे. ही दोन्ही गाणी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यानी भाषांतरित केली आहेत.  या दोनही गाण्याचे संगीतकार वर्षा भावे आणि संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर आहेत.

स्वा. सावरकरांचा व्यापक सामाजिक दृष्टिकोन
वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान तुरुंगात असतानात धर्मांतरावर आळा घालण्याचे काम सुरू केले. तेथील बंदिवानांचे शुद्धिकरणही केले तसेच कैद्यांच्या शिक्षणासाठीही  प्रोत्साहनात्मक काम केले.  रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केले गेले तेव्हाही त्यांनी अशा प्रकारचे सामाजिक पुनरुत्थान केले. यात अस्पृश्यता निर्मूलनाचे मोठे पाऊल त्यांनी टाकले. त्यादृष्टीने त्यांनी मंदिरांमध्ये गर्भगृहात दलितांनाही पूजा करण्याची संधी मिळवून दिली, त्यांचा तो हक्क असल्याचेही सांगितले. तसेच रोटीबंदी, बेटीबंदी, वेदोक्त बंदी, सिंधुबंदी, स्पर्श बंदी, शुद्धिबंदी, व्यवसायबंदी या नावाने हिंदू धर्मात एकेकाळी स्वीकारल्या जाणाऱ्या सात बेड्यांना वा प्रथांनाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. पतितपावन मंदिरातील त्यांचे  अस्पृश्यांना प्रवेश मिळून देण्याचे कार्य हे याच सामाजिक सुधारणेचे पाऊल होते. समाजातील अतिदुर्बलांनाही त्यांनी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तसेच स्वातंत्र्यानंतर हिंदू समाजाच्या एकजुटीबरोबरच त्याचे प्रबोधन करण्यावरही भर देत त्यांनी आपले पुढील जीवन सार्थकी लावले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने आता एक शाखा जम्मू येथेही सुरू करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मर्पणदिनी म्हणजे शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी जम्मू येथे या शाखेसंबंधात घोषणा करण्यात येणार आहे.

Comments are closed.