लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता प्रशासनाने ‘डेडलाइन’ दिली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरुवारी स्वतः महामार्गावरून प्रवास करत सुरू असलेल्या कामांची आणि अपूर्ण भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. महामार्गाची उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून ३१ मार्च २०२७पर्यंत संपूर्ण मार्ग वाहतुकीस सुयोग्य करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. केवळ अंतिम मुदत निश्चित करून थांबायचे नाही, तर प्रत्येक महिन्याचे स्वतंत्र उद्दिष्ट ठरवून त्यानुसार कामाची प्रगती तपासायची, अशी कठोर भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.
अहेरी तालुक्याच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी पंडा यांनी आलापल्ली–सिरोंचा मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची सद्यस्थिती, सुरू असलेली कामे, अपूर्ण भाग तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या ठिकाणांची पाहणी केली. रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहील, यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीसह संबंधित रस्त्यांच्या कामाचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील मुख्य काम फेब्रुवारी २०२७पर्यंत, तर महामार्गावरील उर्वरित कामे ३१ मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामात पुन्हा दिरंगाई होऊ नये यासाठी प्रत्येक महिन्याला किती काम पूर्ण झाले पाहिजे, याचे निश्चित लक्ष्य ठरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निर्धारित महिनानिहाय उद्दिष्ट पूर्ण करण्यात कंत्राटदार अपयशी ठरल्यास त्याला तात्काळ नोटीस बजावावी आणि नियमानुसार दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. पुढील तीन महिन्यांत मंजूर नियोजनानुसार अपेक्षित प्रगती दिसून न आल्यास संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी. अंतिम मुदतीपर्यंत वाट पाहू नका; दर महिन्याला कामाचा हिशेब घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लागाम–आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीचे संबंधित काम ३१ ऑक्टोबर २०२६पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कंत्राटदाराच्या कामाचा मासिक प्रगती अहवाल निर्धारित नियोजनाच्या अनुषंगाने नियमितपणे सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.
महामार्गाच्या कामाला वेग देताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कामाचा वेग, गुणवत्ता आणि महिनानिहाय प्रगती यावर प्रशासनाकडून काटेकोर लक्ष ठेवले जाणार असून विलंब झाल्यास संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या आलापल्ली–सिरोंचा महामार्गासाठी आता मार्च २०२७ची अंतिम ‘डेडलाइन’ निश्चित झाल्याने हा महामार्ग प्रत्यक्षात कधी पूर्णत्वास जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.