स्मार्ट मीटरने वाढवला वीजबिलांचा ‘शॉक’; राष्ट्रवादीचा महावितरणवर धडक मोर्चा

दुप्पट-तिप्पट बिलांमुळे ग्राहक संतप्त; चौकशी करून सुधारित बिले देण्याची मागणी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलांचा आकडा अचानक फुगल्याच्या तक्रारींनी आता आक्रमक वळण घेतले आहे. नियमित वीजवापर असतानाही ग्राहकांच्या हातात दुप्पट-तिप्पट बिले पडत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजितदादा पवार गट) वतीने गुरुवारी महावितरणच्या पोटेगाव रोड येथील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनातून महावितरणच्या कारभारावर जोरदार सवाल उपस्थित करण्यात आला.

‘स्मार्ट मीटर’ बसविले; मग बिल एवढे ‘स्मार्ट’ कसे झाले? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण प्रशासनाला धारेवर धरले. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वीच्या बिलांच्या तुलनेत अनेक ग्राहकांचे वीजबिल दुप्पट, तिप्पट किंवा त्याहीपेक्षा अधिक वाढल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे आधीच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असल्याचा आरोप करण्यात आला.

वीजवापरात लक्षणीय वाढ नसताना बिलात अचानक झालेली वाढ नेमकी कशामुळे झाली, स्मार्ट मीटरचे रीडिंग अचूक आहे का, बिलिंग प्रक्रियेत त्रुटी आहेत का, याची महावितरणने पारदर्शकपणे तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. ग्राहकांच्या तक्रारी केवळ ‘मीटर बरोबर आहे’ या एका उत्तराने झटकण्याऐवजी प्रत्येक वाढीव बिलाची स्वतंत्र तपासणी करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

मोर्चानंतर महावितरण प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वाढलेल्या वीजबिलांची तातडीने पुनर्तपासणी करावी, चुकीच्या मीटर रीडिंगमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे वाढलेली बिले दुरुस्त करून ग्राहकांना सुधारित बिले द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविले असतील तर त्याची चौकशी करा, अशी मागणीही करण्यात आली. मीटर बदलताना ग्राहकांकडून NOC अथवा संमतीपत्र घेण्यात आले असल्यास त्याच्या प्रती संबंधित ग्राहकांना उपलब्ध करून द्याव्यात. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीच्या वतीने मांडण्यात आली.

स्मार्ट मीटर नको असल्याच्या तक्रारी करणाऱ्या ग्राहकांच्या मागण्यांची स्वतंत्रपणे दखल घेऊन शासनाच्या नियमांनुसार निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि प्रभावी तक्रार निवारण प्रक्रिया राबविण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, निवेदनातील मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून ग्राहकांना दिलासा न दिल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला. महावितरणकडून ठोस कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

वीज ग्राहकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने थेट रस्त्यावर उतरून महावितरणला घेरल्याने स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलांचा मुद्दा गडचिरोलीत चांगलाच तापला आहे. ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत असल्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण झाले नाही, तर हा प्रश्न आणखी तीव्र आंदोलनाचे रूप घेण्याची शक्यता आहे.

Light bill issueNCP morcha on mscbNew meter
Comments (0)
Add Comment