‘पदवी ते रोजगार’ प्रवासाला PM-NAPS ची दिशा; गोंडवाना विद्यापीठात उद्योग-विद्यार्थी संवाद

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र STRC चा उद्योग-शिक्षण दुवा अधिक बळकट करण्याचा पुढाकार; शिकाऊ उमेदवारी, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नव्या संधींचा विद्यार्थ्यांना उलगडा...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

एस. चुनारकर,
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र STRC च्या कार्याचा विशेष आढावा सादर करण्यात आला. मत्स्यपालन, औषधी वनस्पती, बांबू उद्योग, स्थानिक उद्योजकता, कौशल्य विकास आणि आदिवासी भागातील शाश्वत विकासासाठी संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांची सांगड घालत STRC ने गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले…

गडचिरोली, दि. ०४ : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःला सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. याच दृष्टिकोनातून गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC) यांनी राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (PM-NAPS) अंतर्गत आयोजित केलेली उद्योग जनजागृती कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योगविश्वाशी थेट संवाद साधणारे प्रभावी व्यासपीठ ठरली. हँडीक्राफ्ट्स अँड कार्पेट सेक्टर स्किल कौन्सिल (HCSSC) यांच्या सहकार्याने आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्या पाठबळाने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधी, उद्योगांच्या अपेक्षा आणि शिकाऊ उमेदवारीचे महत्त्व यांचा सखोल परिचय करून देण्यात आला.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात डॉ. मनीष उत्तरवार, डॉ. भार्गव चंदन,आनंद राठोड तसेच STRC चे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख स्वप्नील गिराडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. स्वागतपर संचालन करीत असताना कु. झीनत सैय्यद यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट केली. मान्यवरांनी उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि शिकाऊ उमेदवारीची वाढती आवश्यकता अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी रोजगारक्षमतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.

तांत्रिक सत्रांमध्ये PM-NAPS योजनेची उद्दिष्टे, उद्योग क्षेत्रातील वाढत्या कौशल्यांच्या गरजा, शासनाच्या कौशल्य विकास उपक्रमांची माहिती, उद्योगांच्या अपेक्षा आणि शिकाऊ उमेदवारीद्वारे करिअर घडविण्याचे विविध मार्ग यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पॅनेल चर्चेत शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन झाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत चर्चेला अधिक अर्थपूर्ण स्वरूप दिले.

कार्यशाळेतील विशेष आकर्षण ठरलेल्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्रात PM-NAPS नोंदणी प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जाची पद्धत तसेच विद्यार्थी आणि उद्योगांना मिळणारे लाभ यांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारीच्या संधींचा प्रत्यक्ष आणि व्यावहारिक परिचय झाला.

यावेळी STRC च्या कार्याचा विशेष आढावा सादर करण्यात आला. मत्स्यपालन, औषधी वनस्पती, बांबू उद्योग, स्थानिक उद्योजकता, कौशल्य विकास आणि आदिवासी भागातील शाश्वत विकासासाठी संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांची सांगड घालत STRC ने गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या कार्यशाळेत ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी रोजगार, करिअर नियोजन, उद्योगांच्या अपेक्षा आणि कौशल्य विकासाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी दिलेल्या सविस्तर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या वाटा अधिक स्पष्टपणे समजल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ, सहभागी विद्यार्थी आणि आयोजन समितीचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीला चालना देत उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणारा हा उपक्रम गडचिरोलीतील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली…

उद्योगविश्वाशी थेट संवाद.. प्रभावी व्यासपीठकुलगुरू डॉ प्रशांत बोकारेकौशल्य विकासगोंडवाना विद्यापीठगोंडवाना विद्यापीठात उद्योग जनजागृती कार्यशाळानॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC)विद्यार्थ्यांसाठी रोजगारहँडीक्राफ्ट्स अँड कार्पेट सेक्टर स्किल कौन्सिल (HCSSC)
Comments (0)
Add Comment