Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परमबीर सिंग यांच्यावर अकोल्यात ॲट्रॉसिटीसह २२ गुन्हे दाखल

भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, २९ एप्रिल : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे. परमबीर यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.

यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलीस अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

परमवीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा हप्ता मागितल्याचा आरोप केला होता. आता परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Comments are closed.