Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. २० : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशित ( इतर मागास प्रवर्ग OBC, विमुक्त जाती VJNT, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा SBC तसेच धनगर समाजातील पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना चे लाभ घेणारे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे.

सदर योजने अंतर्गत वर उल्लेखित समाजाच्या विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात आली असून खालील प्रमाणे लाभार्थी निवडीचे प्रमुख निकष ठरविण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यार्थी इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा समाजातील असावा. इयत्ता १२ मध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयत्ता १२ वी नंतर मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी हा चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा असावा. एका विद्यार्थ्यांस 5 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. परंतु, इंजिनिअरिंग, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त ६ वर्षे अनुज्ञेय राहील.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेला विद्यार्थी योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी लाभास पात्र असेल तथापि, सदर विद्यार्थी योजने अंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपक्षा अधिक वयाचा नसावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या- त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उर्त्तीण होणे अनिवार्य राहील. समाजातील अपंग विद्यार्थ्याना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांस ऑफलाईन पध्दतीने संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपूर यांचेकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. तरी सदर योजनेकरीता तात्काळ अर्ज सादर करण्यात यावे. अर्ज स्विकारण्याचा कालावधी २० जून ते १५ जुलै २०२४ पर्यंत राहील, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्य सहायक संचालक आशा कवाडे यांनी कळविले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.