Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त

जंतनाशक दिन निमित्त 4 डिसेंबर रोजी 90994 बालकांना देणार जंतनाशक गोळी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि. ३: जिल्ह्यातील आरमोरी व चामोर्शी तालुके वगळता इतर 10 तालुक्यात 1 ते 19 वयोगटातील एकूण 1 लाख 90 हजार 994 लाभार्थ्यांना 4 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.

जिल्ह्यात येत्या ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार असून या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. आरोग्य विभागाने याबाबत नियोजन केले असून शिक्षण विभाग व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील 1,90,994 मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे आदी आजारांचा धोका उद्भवतो. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राष्ट्रीय जंतनाशक दिनाची तयारी केली असून, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 1713 अंगणवाडी केंद्रे,1190 जिल्हा परिषद शाळा, 84 आश्रमशाळा, 92 खाजगी शाळा, 14 महाविद्यालय, 151 सरकारी महाविद्यालय असे एकूण 3244 संस्थामधून मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. काही कारणास्तव ४ डिसेंबरला ज्या बालकांना जंतनाशक गोळी दिली गेली नसेल अशा वंचित सर्व बालकांना १० डिसेंबरला मॉप-अप दिनी ही गोळी देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.

जंतामुळे मुलांमध्ये ॲनिमिया , पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजारांचा मुलांना धोका असतो. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाकडून सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. या मोहिमेदरम्यान १ ते १९ वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ प्रफुल्ल हुलके यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जंतनाशक दिनी १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. २ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते.

बालकांच्या आरोग्याविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.

शासकीय रुग्णालयात मिळते मोफत गोळी
अल्बेंडाझोल ही गोळी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिली जाते. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.