अहेरीत “लक्ष्य ” द्वारे 14 लक्षांकपूर्ण गुणवंतांचा सत्कार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 21 मे – स्थानिक दानशूर चौकातील “लक्ष्य “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे तालुक्यातील होतकरू, मेहनती तथा गरीब विद्यार्थ्यांना विविध विभागांच्या स्पर्धेत यश संपादन करण्याच्या हेतूने उत्तम मार्गदर्शन केले जाते. परिणामी नुकत्याच जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये 14 गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन करून नोकरी मिळविण्याचा लक्षांक पूर्ण केल्याने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन कार्यक्रमाचे उद्घाटक तथा वितरक किशोर मानभाव, पोलिस निरीक्षक अहेरी तथा इतर पाहुण्यांच्या हस्ते यशवंतांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था आलापल्लीचे संस्थापक गिरीश मद्देरलावार तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रूषी सुखदेवे सह आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे माजी विभागीय अध्यक्ष बबलू सडमेक यावेळी उपस्थित होते.
2015 पासून सुरू झालेल्या लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या 30 विद्यार्थ्यांनी प्राविण्याने नोकरी करिता यश संपादन केले. नुकत्याच जिल्ह्यातील ३०० पोलिसांच्या जागेकरिता ४० हजार अर्ज प्राप्त झाले होते.यात 14 विद्यार्थ्यांची सतत परिश्रम व जिद्दीच्या बळावर पोलीस दलात नेमणूक झाल्याने मोफत मार्गदर्शनाचा गरीब विद्यार्थ्यांना लाभ होत असल्याचे मत संचालक तथा मार्गदर्शक सतीश पानगंटीवार व विनोद दहागावकर यांच्यासह शुभम नीलम, नरेंद्र मडावी यांनी मांडले.
स्पर्धेच्या यशस्वीतांमध्ये रोहित पाले, राज कोरंटलावार, संदीप गुरनुले ,राजकिरण गुरनुले, हर्षल कुमरे , द्रोपदा सिडाम, वनिता वाकडोतपवार, पूर्वा डांगे, रीमा सोनुर्ले, सानिया पठाण यांची पोलीस दलात तर सुनील पदा (सीआयएसएफ) व प्रज्वल मळावी (अग्निवीर) सह अनवाद शेख, पोस्टमन म्हणून निवड झाल्याने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन पटवारी भवनातील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश मद्देरलावार यांनी यापुढेही अशाच कार्यक्रमांकरिता व होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेद्वारे मदत केली जाईल तर उद्घाटक पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी मार्गदर्शन केंद्राकरिता तांत्रिक बाबीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. बबलू सडमेक यांनीही पुढे खचून न जाता मेहनत करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाला लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सर्व होतकरू, मेहनती मुले व मुली यांनी हिरीरीने भाग घेऊन आनंदोत्सव यावेळी साजरा केला. लक्षांक पूर्ण करून शासकीय नोकरी प्राप्त करण्याच्या सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गाऊत्रे तर पाहुण्यांचे आभार एडवोकेट पंकज दहागावकर यांनी मांडले.
हे पण वाचा :-


Comments are closed.