Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 182 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

1 कोटी 9 लाख रुपये नुकसान भरपाई वसूल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 28 जुलै – राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील ९० प्रलंबित आणि ९२ दाखलपूर्व असे एकूण १८२ खटले आपसात तडजोडीने निकाली निघाले असून एकुण १ कोटी ०९ लाख ३५ हजार ७२९ रुपये नुकसान भरपाई वसुली करण्यात आली. तसेच. किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ३१ प्रकरणे गुन्हा कबूलीद्वारे निकाली निघाले आहे.

जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात दिनांक २७ जुलै, २०२४ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेशाबाबतची कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे असे न्यायालयात प्रलंबीत दावे व दाखलपूर्व वाद प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे, पतसंस्था व बँकाची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकीत कर्ज प्रकरणे, ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे, घरकुल अनुदान वसुली प्रकरणे तसेच ग्राहक न्यायालयातील प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे ठेवण्यात आली होती. जिल्हयात एकुण १० पॅनल ठेवण्यात आले होते. व्ही. एस. कुलकर्णी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली व आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली यांनी पॅनल क्र. ०१ वर काम पाहीले, पॅनल क्र. ०२ वर  सी. पी. रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली, पॅनल क्र. ०३ वर श्रीमती व्ही. आर. मालोदे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांनी काम पाहिले.सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघातील समस्त अधिवक्ता वृंद, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.