गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून २१० नागरिकांची तपासणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या ध्येयाने गडचिरोली पोलीस दलाने नवनिर्मित पोमके फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमातून कोपर्शी, फुलणार, गुंडूरवाही, पोयरकोठी व परिसरातील सुमारे २१० नागरिक व विद्यार्थ्यांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून सखोल तपासणी करण्यात आली.
पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. विरेंद्र भावे (फिजिशियन), डॉ. शारदा ठाकरे (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. देवश्री होळी (नेत्ररोगतज्ञ), डॉ. समीर बनसोडे (बालरोगतज्ञ) तसेच राकेश चांदेकर व शिल्पा चांदेकर यांनी सहभाग घेत नागरिकांची तपासणी केली.
शिबिरादरम्यान विविध आजारांची तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. पोषण समस्या, स्त्री आरोग्य, बाल आरोग्य आणि नेत्र तपासणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून आवश्यक औषधे देण्यात आली. एकूण २८ नागरिकांना पुढील विशेष उपचारासाठी विविध रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने सन २०२१ पासून आजपर्यंत १७९ आरोग्य मेळाव्यांद्वारे ४०,२६५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच ५ रक्तदान शिबिरांमधून ४,३६१ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत ९,९७१ हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करून १,४१२ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
या शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली सुहास गाडे, कमांडंट सीआरपीएफ ३७ बटालियन श्री. दाओ इंजिरकन किंन्डो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
नवनिर्मित पोमके फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) चे प्रभारी अधिकारी सपोनि. युवराज घोडके यांच्या नेतृत्वात पोउपनि. श्री. सतीश पवार, आकाश जाधव, रापोउपनि. प्रशांत पाटील, आर. दाबेराव व अंमलदारांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

