चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे बंद होणार; वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी घ्यावी काळजी
गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात सतर्कतेचे आवाहन; प्रशासनाकडून दवंडीने जनजागृती....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर वसलेले चिचडोह बॅरेज आता पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. यानुसार जलसंपदा विभागाने येत्या २५ ऑक्टोबर २०२५ पासून या बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे क्रमशः बंद करण्याचा निर्णय घेतला असून, नदी पात्रातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार आहे.
दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया द्वारसंचलन कार्यक्रमानुसार प्रथम नदीकाठावरील, त्यानंतर मध्यभागातील दरवाज्यांपासून सुरू होणार आहे. त्यामुळे नदीच्या उर्ध्व भागात, तसेच उपनद्यांमध्ये व नाल्यांमध्ये पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.
२०१८ मध्ये पूर्ण झालेले हे धरण चामोर्शी मुख्यालयापासून उत्तरेस ५ किमी आणि प्रसिद्ध मार्कंडा देवस्थानापासून सुमारे ४ किमी अंतरावर वसले आहे. ६९१ मीटर लांबी व १५ मीटर रुंदीच्या या बॅरेजमध्ये ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. सध्या (२३ ऑक्टोबर २०२५) धरणातील पाण्याची पातळी १७५.३० मीटर इतकी नोंदवली गेली आहे.
वाढत्या पाणीसाठ्यामुळे संभाव्य जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नदीलगतच्या सर्व गावांना इशारा देण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनी आपल्या गावांमध्ये दवंडी व जनजागृतीद्वारे नागरिकांना सावधानतेची माहिती द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच नदीकाठावर शेतीकामे करणारे शेतकरी, मासेमारी करणारे, पशुपालक, नदीपात्रातून रेती काढणारे तसेच मार्कंडा यात्रेकरी यांनी नदी पात्रात प्रवेश टाळावा असे प्रशासनाने आवर्जून सांगितले आहे.
या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा ….
गडचिरोली जिल्ह्यातील कुरूड, रामपूर, विसापूर, निमगाव, खोर्दा, हिवरगाव, तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगाव (रै.), आमगाव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगाव, फराडा, डोटकुली, डोंगरगाव (बु.), शिवणी, मुडझा (बु.) आणि पुलखल, तर चंद्रपूर जिल्ह्यातील हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगाव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगाव आणि कापसी (उपरी) या गावांना पाण्याची पातळी वाढल्याने संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.
सावधानता म्हणजे सुरक्षितता ..
वैनगंगा नदीत पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोणतीही निष्काळजीपणा टाळावा. नागरिकांनी नदी ओलांडण्याचा किंवा बुडीत क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासनाने दिलेल्या सूचना गांभीर्याने पाळल्यास कोणतीही जीवितहानी टाळता येईल.
प्रशासनाच्या मते, येत्या काही दिवसांत धरणात पाणी साठवणुकीचा स्तर वाढत जाईल. त्यामुळे नदीलगत राहणाऱ्या प्रत्येकाने सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

