ऑपरेशन रोशनी’मधून ४६१ जणांना नवी दृष्टी
गडचिरोली पोलीस दलाचा दुर्गम भागातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३ : जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील दृष्टीदोषग्रस्त नागरिकांसाठी गडचिरोली पोलीस दलाने पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत राबविलेला ‘ऑपरेशन रोशनी’ हा उपक्रम प्रभावी ठरला असून, त्यातून ४६१ नागरिकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे अनेक गरजू नागरिकांना दृष्टी प्राप्त झाली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर व शालीनीताई मेघे रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर एकूण ११ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
या शिबिरांमध्ये तसेच मोबाईल हॉस्पिटल व्हॅनच्या माध्यमातून १,४७३ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मोतीबिंदू निदान झालेल्या ४६१ रुग्णांची निवड करून दोन टप्प्यांत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने अनेक नागरिकांना दैनंदिन जीवन पुन्हा स्वावलंबीपणे जगण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन रोशनी’मुळे दृष्टीदोषामुळे अडचणीत असलेले नागरिक आता बदलते गडचिरोली प्रत्यक्ष अनुभवू शकणार आहेत. भविष्यातही ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल.
या मोहिमेसाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, तसेच नेत्रतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब व शालीनीताई मेघे रुग्णालयाच्या पथकाने सहकार्य केले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाची टीम, रोटरी क्लब व शालीनीताई मेघे रुग्णालयाचे वैद्यकीय पथक तसेच नागरी कृती शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.

