गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा
ऑल इंडिया रेसलिंग गेम्स २०२५–२६ मध्ये सुवर्ण–रौप्य यश...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. २० जानेवारी २०२६ :
चंदीगड विद्यापीठ येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया रेसलिंग गेम्स २०२५–२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची राष्ट्रीय पातळीवर छाप उमटवली आहे. देशभरातील विविध विद्यापीठांच्या कुस्तीपटूंमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत गोंडवाना विद्यापीठाच्या खेळाडूंनी ताकद, तंत्र आणि चिकाटीच्या बळावर सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली.
ही उल्लेखनीय कामगिरी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न भगवान चक्रधर स्वामी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, तळोधी (बाळापूर), जि. चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी साध्य केली आहे. फ्री-स्टाईल ७४ किलो वजनगटात निशांत रुहिल याने उत्कृष्ट खेळ सादर करत सुवर्णपदक पटकावले. त्याला प्रशिक्षक समुंदर दलाल यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रीको-रोमन ८२ किलो वजनगटात विजय करमबीर याने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. त्याला प्रशिक्षक आशिष देवतळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशामागे संघ व्यवस्थापक डॉ. जंग बहादूर सिंग राठी यांचे प्रभावी नियोजन, शिस्तबद्ध नेतृत्व आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या नेतृत्वामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी साध्य केली. तसेच या खेळाडूंना गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे सहकार्य लाभले असून, क्रीडा संचालक डॉ. अनीता लोखंडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या यशामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील क्षमता आणि गुणवत्ता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली असून, भविष्यातही विद्यापीठाचे खेळाडू अशीच उज्वल कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

