गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘उत्कर्ष’ राज्यस्तरीय स्पर्धेत रासेयो विभागाचा शिस्तीचा विजय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. ८ : राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक मंचावर गोंडवाना विद्यापीठाने पुन्हा एकदा आपल्या कार्याची आणि शिस्तीची ठळक छाप उमटवली आहे. राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाला राज्यस्तरीय ‘उत्कर्ष २०२५–२६’ स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, हा गौरव विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.
दि. ४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (महाराष्ट्र शासन) आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील रासेयो स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता. या चुरशीच्या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने शिस्त, संघभावना, वेळेचे काटेकोर पालन आणि सामाजिक भान यांचे प्रभावी दर्शन घडवत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक संवर्धन आणि युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कालावधीत दाखवलेली जबाबदार, संयमी व शिस्तबद्ध भूमिका आयोजक व परीक्षकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली. त्यामुळेच विद्यापीठाला ‘सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ’ हा बहुमान प्राप्त झाला.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. श्याम खंडारे, संघ व्यवस्थापक प्रा. अंतबोध बोरकर तसेच सर्व स्वयंसेवकांचे मनापासून अभिनंदन केले. हा सन्मान केवळ पुरस्कार नसून, गोंडवाना विद्यापीठाच्या सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण योगदानाची आणि मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणालीची पोचपावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भविष्यातही राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत समाजाभिमुख उपक्रम, शिस्तप्रिय स्वयंसेवक घडविणे आणि सामाजिक जाणिवेचे भान निर्माण करणारे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहील, असा विश्वास रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी व्यक्त केला आहे.

