Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रशासन, अभ्यास आणि संवेदनशीलतेचा त्रिवेणी संगम — डॉ. किशोर मानकर यवतमाळ वनवृत्तात मुख्य वनसंरक्षकपदावर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ २५ जुलै : तब्बल ९ महिन्यांनंतर यवतमाळ वनवृत्ताला स्थिर नेतृत्व लाभले असून, बुधवारी (२३ जुलै) भारतीय वनसेवा अधिकारी डॉ. किशोर मानकर यांनी मुख्य वनसंरक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. यवतमाळचेच सुपुत्र असलेले डॉ. मानकर हे प्रादेशिक, सामाजिक वनिकारण, वन्यजीव, मूल्यांकन असा विविध प्रशासकीय विभागाचा अनुभव, पर्यावरणस्नेही दृष्टिकोन आणि सामाजिक भान या त्रिसूत्रीवर चालणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या स्वागताने वनविभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. मानकर हे केवळ अधिकारी नसून, पर्यावरणविषयक संवेदनशील अभ्यासक, जैवविविधतेचे पुरस्कर्ते आणि खऱ्या अर्थाने ‘लोकाभिमुख’ वनसंरक्षक आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली, पश्चिम बंगालची दुर्गम अरण्ये, आणि नागपूरच्या वनप्रशिक्षण केंद्रातील अध्यापन यांसारख्या विविध स्तरांवरील त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“वन म्हणजे फक्त झाडं नव्हे, ती आपल्या श्वासाचा आधार आहे. मी केवळ वनसंरक्षक नाही, तर या जनतेच्या भविष्याचा ऋणी सेवक आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी पदभार स्वीकृतीप्रसंगी कर्मचाऱ्यांपुढे व्यक्त केले. त्यांच्या या विधानाने विभागात एक सकारात्मक ऊर्जा आणि आत्मभान निर्माण झाले आहे.

या स्वागत सोहळ्याला सामाजिक वनीकरण संघटनेचे राज्य सहसचिव गोपाल जीरोनकर, वनपाल पी. पी. लांडगे, सहायक वनसंरक्षक विद्या कांबळे, अधीक्षक जाट, प्रशांत वाकुलकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ. मानकर यांच्या नेतृत्वामुळे हरित मोहिमा, वन्यजीव संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि आदिवासी भागीदारीचे उपक्रम नव्या जोमाने राबवले जातील, अशी विभागीय तसेच सामाजिक क्षेत्रातून अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments are closed.