SBI बँक चोरीचा दोनदा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सलग दोन वेळा चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी अटक करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे बिभास उर्फ संजु बच्चु डे (२३, रा. पाखांजूर, कांकेर – छत्तीसगड) यास ताब्यात घेण्यात आले.
दि. १६ डिसेंबर २०२५ आणि ७ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री आरोपीने खिडकीतून बँकेत प्रवेश करून लॉकर व एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही वेळा चोरी फसली.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने आरोपीचा माग काढत अटक केली. आरोपीस न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सलग चोरीचे प्रयत्न उधळून लावत एटापल्ली पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक संदेश दिला असून, या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

