ड्रोन उडवले तर चुकणार नाही! गडचिरोलीत पुढील १५ दिवसांसाठी कठोर बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई
Miलोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २१ मे : दहशतवादी कारवाया आणि देशविरोधी हालचालींचा संभाव्य धोका लक्षात घेता, गडचिरोली जिल्ह्यात ड्रोन, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आणि इतर मानवरहित हवाई उपकरणांच्या वापरावर तातडीने कडक बंदी लागू करण्यात आली आहे. २० मे ते ३ जून २०२५ या काळात कोणत्याही प्रकारचा अनधिकृत ड्रोन उडवला गेल्यास थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला आहे.
घातपाताचा धोका, सुरक्षा यंत्रणा सतर्क!
देशाच्या सीमांवरील तणावपूर्ण वातावरण आणि आततायी कारवाया लक्षात घेता, ड्रोन व मानवरहित यंत्रांद्वारे घातपात घडवून आणण्याचा धोका असल्याचे गृहित धरले जात आहे. अशा प्रकारचे उपकरण वापरून अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष्य साधले जाऊ शकते, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा प्रशासनाचा स्पष्ट इशारा आहे.
पोलीस अधीक्षकांचा कठोर आदेश
गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी नीलोत्पल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार हा आदेश लागू केला आहे. हा आदेश पोलीस स्टेशनचे नोटीस बोर्ड, प्रसारमाध्यमे आणि अधिकृत वेबसाइट्सवर प्रकाशित करून अमलात आणण्यात येणार आहे. यास हवाई गस्त किंवा विशिष्ट लेखी परवानगीसह होणारे पोलिसांचे ऑपरेशन्स अपवाद असतील.
कोणीही आदेश मोडला तर थेट गुन्हा…
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम २२५ अंतर्गत तसेच अन्य संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाच्या दृष्टीने हा सुरक्षा विषयक अत्यंत संवेदनशील प्रश्न असून नागरिकांनी यामध्ये सहकार्य करणे आवश्यक आहे, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केल.
सर्वसामान्यांसाठी आवाहन…
कोणत्याही प्रकारचा ड्रोन उडविण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी विनाकारण संशयास्पद हालचाली टाळाव्यात. कुठेही अनधिकृत हवाई यंत्रणेचा वापर निदर्शनास आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.