Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘मनरेगा’ मध्ये रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्हा राज्यात पहिला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अमरावती, दि. २५ मार्च: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगार निर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. 2020-21 या वर्षात अमरावती जिल्ह्यात 96 लक्ष 51 हजार मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाली आहे. पालघर जिल्ह्यात 46 लक्ष 69 हजार मनुष्यदिन, तर गोंदिया जिल्ह्यात 45 लक्ष 98 हजार मनुष्यदिन निर्मिती होऊन ते अनुक्रमे दुस-या व तिस-या क्रमांकावर राहिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गतवर्षी कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर लॉकडाऊन झाले. शहरांत अनेक कामे बंद झाल्याने मजूर आपापल्या गावोगावात परतले. मेळघाटसह ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. या काळात स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्यात ‘मनरेगा’ने मोलाची भूमिका बजावली. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची गरज लक्षात घेऊन अमरावती च्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या व जलसंधारण, रस्तेविकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. गावपातळीवरील कामाची गरज व त्यातून विविध विकासकामांना चालना यांचा सर्वंकष विचार करून सूक्ष्म नियोजन करण्याबाबत स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या नियोजनात शेततळे, ढाळीचे बांध, वनतळे, वृक्षलागवड, रोपवाटिका, घरकुल, सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर अशा अनेक कामांचा समावेश करण्याची सूचना केली. त्यामुळे गत एप्रिलपासून जिल्ह्यात मोठी रोजगारनिर्मिती व्हायला सुरुवात झाली.

जिल्ह्यात गत वर्षभरात 96.51 लक्ष मनुष्यबळदिन निर्मिती झाली. या योजनेत मजुरीवाटप आदी कामे वेळेत केल्याने खर्चातही जिल्हा आघाडीवर राहिला. 240 कोटी 61 लाख 51 हजार खर्च करण्यात आला आहे. कोरोना साथ लक्षात घेऊन एप्रिलपासून अधिकाधिक रोजगारनिर्मितीवर भर दिला. एप्रिलमध्ये सुरुवातीला दैनिक मजूर उपस्थिती 19 हजार 346 होती. तीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ती मे महिन्यात 96 हजार 930 पर्यंत एवढी झाली. आता विविध योजनांची मनरेगाशी सांगड घालून अभिसरणातून कामे राबविण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मेळघाटातील आदिवासी मजूर दरवर्षी कामाच्या शोधात इतर मोठ्या शहरात पलायन करतात मात्र यावेळी मनरेगा चे कामं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने त्यांचे पलायन रोखले. तसेच योजनेचे सूक्ष्म नियोजन व रोहयो विभाग, तालुका प्रशासन व इतर विभागांचे उत्तम टीमवर्क यामुळे कोविड काळात अधिकाधिक गरजू नागरिकांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळू शकला असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.